पुणे : ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग सध्या गाव नकाशांमध्ये आहेत. मात्र, काही रस्त्यांची नोंद दप्तरी नसल्याने स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी येत असून, काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने रस्त्यांचे वर्गीकरण करून त्याची अधिकार अभिलेखातील नोंद करण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांना जिल्हा, तालुका, गाव त्याच्या वापरानुसार क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या नोंदींअभावी उद्भवणारे वाद कमी होतील.
राज्यात १८९० ते १९३० या कालावधीत झालेल्या मूळ जमाबंदी व सर्वेक्षणावेळी तयार करण्यात आलेल्या नकाशांमध्ये, तसेच एकत्रीकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशांमध्ये अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग दर्शविण्यात आले आहेत.
मात्र, त्यानंतर वेळोवेळी केलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नाही. याची नोंद करण्यासाठी आता ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) हे महसूल सेवक (कोतवाल) व पोलिस पाटील यांच्या मदतीने रस्त्यांची यादी तयार करतील.
त्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात येईल. गाव नकाशावर नोंद असलेले वापरातील, तसेच अतिक्रमण झालेल्या सर्व रस्त्यांची नोंद यात घेण्यात येईल. वापरात असलेले, परंतु गाव नकाशावर नाहीत, अशा रस्त्यांचा तपशील घेण्यात येणार आहे.
अतिक्रमण झालेल्या रस्त्यांबाबत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी रस्तानिहाय प्रस्ताव तयार करतील. यामध्ये रस्त्यांच्या शेजारील शेतकऱ्यांचे नाव, सातबारा उतारा, फेरफार नोंदी यांचा तपशील नमूद करतील.
गावनिहाय तयार करण्यात आलेली रस्त्यांची प्राथमिक यादी ग्रामसभेच्या मान्यतेनंतर तहसीलदारांकडे सादर करण्यात येईल. भूमी अभिलेख उपअधीक्षकांकडून या रस्त्यांचे सीमांकन करण्यात येईल.
रस्त्याला विशिष्ट संकेतांक
◼️ सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच ग्रामीण विकास विभागाच्या रस्त्यांना तेच संकेतांक कायम राहणार आहेत.
◼️ ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग यांना स्वतंत्र संकेतांक देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
◼️ यात जिल्हा, तालुका यांचा सांकेतांक दोन अंकी असेल. तर, गावाचा सांकेतांक तीन अंकी व रस्त्याच्या प्रक्रारानुसार त्याचा सांकेतांक एक अंकी असेल.
◼️ सांकेतांक निश्चित झाल्यानंतर त्यांची नोंद ग्राम महसूल अधिकारी हे त्या गावाच्या अभिलेखात, तसेच गाव नमुना-१ मध्ये घेण्यात येतील.
नोंदी अद्ययावत
◼️ मूळ सर्वेक्षणावेळी मोजणी केलेले व रस्त्यांच्या लांबी व रुंदीच्या नोंदी उपलब्ध असलेल्या रस्त्यांच्या नोंदी तलाठी गाव दप्तरात घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच काही गावांमध्ये निस्तार पत्रकात अशा रस्त्यांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.
◼️ अशा रस्त्यांच्या नोंदी केवळ संबंधित गावाच्या आकारबंदात 'रस्त्याकडील क्षेत्र' या सदराखाली गावातील सर्व रस्त्यांच्या एकूण क्षेत्राची नोंद आहे. परंतु त्याबाबतचा तपशील उपलब्ध नाही.
◼️ त्यामुळे या नोंदी रस्त्याच्या लगतच्या सातबारा उताऱ्यावर अधिकार अभिलेखात इतर हक्कात करणे, तसेच त्याचा एकत्रित तपशील व नोंदी गाव दप्तरात ठेवणे व अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांचा तपशील एकत्रित मिळेल.
या रस्त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा, अतिक्रमणमुक्त रस्ते आणि बारमाही वापरायोग्य रस्त्यांची निर्मिती यावर भर देण्यासाठी काय उपाययोजना राबविता येईल. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हे रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. - डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, जमाबंदी, पुणे
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर