Join us

निर्यातीचा कोठा अतिशय कमी; कांद्याचे भाव पुन्हा वाढणार की कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 10:49 AM

गेल्या काही महिन्यात कांद्याचे भाव स्थिर पाहायला मिळाले. मात्र, आता गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात (दि. ६) ला कांद्याला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

चाकण : गेल्या काही महिन्यात कांद्याचे भाव स्थिर पाहायला मिळाले. मात्र, आता गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात (दि. ६) ला कांद्याला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

परंतु येणाऱ्या काळात कांद्याची आवक वाढून बाजारभाव कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी (दि. १) नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्टमार्फत कांद्याच्या निर्यातीला अटी व शर्तीसह परवानगी दिली.

सरकारने नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडमार्फत यूएई आणि बांगलादेशला ६४,४०० टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार ५० हजार टन कांदाबांगलादेशला तर १४,४०० टन कांदा यूएईला निर्यात केला जाईल.

केंद्र सरकारच्यावतीने वाणिज्य मंत्रालयाने यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे. मात्र, निर्यातीचा हा कोठा अतिशय कमी असल्याने त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी केंद्र सरकारने सात डिसेंबर २०२३ देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी ऐन हंगामामध्ये कांद्यावर निर्यातबंदी घातली. परिणामी बाजारात येणाऱ्या कांद्याचे दर कमालीचे कोसळले.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी विदेशामध्ये कांद्याला मागणी असतानादेखील केंद्र सरकार जाणीवपूर्वक निवडणुकीवर लक्ष ठेवून शेतमालाचे बाजारभाव पाडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी केला होता. तत्पूर्वी कांद्यावरील निर्यातबंदी उठेल या अपेक्षेने कांदा बाजारात काही क्षण तेजी आली होती.

कांदा पुरवठ्याचे संकटदेशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव गगनाला भिडल्यानंतर गेल्या वर्षी कांदा निर्यातीवर निर्बंध लादण्यात आले होते. डिसेंबर २३ ते मार्च २४ या कालावधीत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

अनेक देशांमध्ये कांदा पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये कांदा निर्यातीवरील निर्बंधात मर्यादित शिथिलता दिली. फेब्रुवारीच्या अखेरीस सरकारने शेजारील बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान या देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली.

कांद्याची निर्यातबंदी हटविण्यात यायला हवी. केंद्र सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काही दिवसांनंतर कांद्याची आवक वाढणार आहे. त्यांनतर कांद्याचे भाव पडणार आहे. - कैलास लिंभोरे पाटील, सभापती बाजार समिती, खेड

देशातील पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातील उन्हाळी कांद्याची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचे भाव उतरणार आहेत. - विक्रम शिंदे, कांदा व्यापारी

टॅग्स :कांदाशेतकरीचाकणशेतीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डबांगलादेशनेपाळखेडभूतान