मालेगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित एच एच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय मालेगाव येथे ‘आविष्कार २०२४ संशोधन स्पर्धा १७ व १८ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना देण्यासाठी आविष्कार, अन्वेषण, इनोव्हेशन, परिषदा यासारखे उपक्रम राबविले जातात. याद्वारे विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच सहभागी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील सायन्स आणि इनोव्हेशन पार्क, इन्कुबेशन सेंटर व एस्पायर यासारख्या संशोधन प्रोत्साहन योजनांशी जोडणे शक्य होते.
याच अनुषंगाने आयोजित या स्पर्धेकरीता १० जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील संशोधक पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीधारक एकूण २०३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग सहा विभागामध्ये नोंदविला होता.
यावेळी स्पर्धेचे उदघाटन संचालक राष्ट्रीय छात्र सेना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी राहुरी कृषि विद्यापीठ डॉ. महावीरसिंग चौहान तसेच शेतकऱ्यासाठी कमी किमतीत औजारे बनवून देशपातळीवर मालेगावचे नाव उज्वल करणारे देवारपडे येथील कमलेश घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तर अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. विठ्ठल मोरे होते.
पहिल्या दिवशी एकूण २०३ विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेलच्या माध्यमातून आपले सादरीकरण केले. पैकी ६२ विद्यार्थ्यांची दुसऱ्या पात्रता फेरी करिता निवड झाली. ज्यातून पुढे एकूण ३८ विद्याथ्यांनी सहा विभागांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.
या बक्षीस वितरण सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे शासकीय कृषी महाविद्यालय धुळेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बबनराव इल्हे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे उपाध्यक्ष माननीय डॉ. सुभाष निकम होते.
या स्पर्धेमध्ये सर्वाधिक १० पारितोषिके कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांनी पटकविले. तर कृषी महाविद्यालय बारामती यांनी त्या खालोखाल सात पारितोषिके पटकवले.
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त संपदा हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, सह सचिव डॉ. विठ्ठल मोरे, महाविद्यालय विकास समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष निकम, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश राऊत, उद्यानविद्या महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ वैशाली पगार यांनी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष कष्ट घेतले. तसेच यावेळी परीक्षक म्हणून मालेगाव पंक्रोशीतील नामांकित महाविद्यालतील अनुभवी संशोधक लाभले होते.