नागपूर शहरातील अंबाझरी तलावाला जलपर्णीने विळखा घातला असून, ही जलपर्णी महापालिका प्रशासनासाठीही डोकेदुखी ठरली होती; पण आता या जलपर्णीचा उपयोग महापालिका इको फ्रेंडली वस्तूच्या निर्मितीसाठी करणार आहे. (Eco-Friendly Products)
त्यासाठी महानगरपालिकेतर्फे शंभर महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील स्वयंसहायता बचत गटांना रोजगाराचे साधन मिळणार आहे. (Eco-Friendly Products)
महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जलपर्णीपासून हस्तशिल्प व रोजगारनिर्मितीसाठी ३३.०७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. जलपर्णी कापून यातून पर्यावरणस्नेही वस्तूंची निर्मितीचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. (Eco-Friendly Products)
'या' वस्तूंची होणार निर्मित्ती
जलपर्णीपासून टोपली, कागद कार्डबोर्ड, टोपी, चटई, फर्निचर पॅकिंगचे कागद तसेच ज्यूट सोबत मिळून दोरखंड आदी वस्तू तयार करता येतात. त्याचबरोबर बास्केट, विविध आकारातील पर्स, चटई, योगा मॅट, टोपी, टी-कोस्टर अशा २०० वस्तूंची निर्मिती केली जाऊ शकते.
बचत गटाच्या महिलांना या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंबाझरी तलावामध्ये फोफावलेल्या जलपर्णीपासून महापालिका इको फ्रेंडली वस्तू बनविणार आहे.
महिला बचत गटांना काम
जलपर्णी कापण्याकरिता राज नालंदा वस्तीस्तर संस्थेअंतर्गत स्थापित महिला बचत गटांना कामे दिले आहे. यात भिमाई महिला बचत गट, पंचशील महिला बचत गट, आर्या महिला बचत गट, सावित्रीच्या लेकी महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट यांना परवानगी देण्यात आली आहे.
पारडी येथे कौशल्य प्रशिक्षण
* अंबाझरी तलावापासून निघणाऱ्या जलपर्णीपासून विविध वस्तू तयार करण्याकरिता पुनापूर पारडी येथील नागपूर स्मार्ट सिटीतर्फे बांधण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रात १०० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
* लूम मशीनद्वारे वस्तू तयार करण्यासाठी ५० महिलांना आणि रोलर मशीनद्वारे वस्तूंची निर्मिती करण्यासाठी ५० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.