Join us

बहुगुणी करवंदाचे संवर्धन करत व्यावसायिक लागवडीतून कमवा अधिकचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 4:15 PM

डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरू लागली आहे.

डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरू लागली आहे. आता रानमेवाही तयार होऊ लागल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार आहे.

त्यामुळे आदिवासी बांधवांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला प्रथम दर्शन होते ते आंबटगोड करवंदांचे. डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंदांचे घड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो.

आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात. वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेची पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट, गोड, रसाळ, रानमेवा जिभेवर ठेवताच तासनतास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होतेच होते. विलायती चिंच, आवळा, बोरे, कैरी आदीची चवही काही न्यारीच.

करवंद हे बेरी वर्गीय फळ असून त्याचा आरोग्य राखण्यासाठीही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिकारशक्तीचे काम करतात. करवंद हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही, मात्र कच्च्या करवंदाचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरंब्बा केला तर जास्त काळ टिकतो. करवंदांच्या झाडांना प्रचंड प्रमाणात काटे असतात.

खाल्ल्यानंतर मिळतो मनाला गारवाडोंगरांची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांचा गोडवा वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशा गर्मीत मनाला गारवा देणारी करवंद खायची संधी मिळते. डोंगररांगेत मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळ्या पाहायला मिळतात. थंडगार असलेली करवंद खायला मस्त असून ती खाल्ल्यानंतर मनाला गारवा मिळतो.

या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे• अशामध्ये कष्टपूर्वक काढलेल्या करवंदांना कमी भाव बाजारात मिळतो. शहरात व ग्रामीण भागात उन्हाळी रानमेव्याव्यतिरिक्त करवंदांची चव काही औरच असते, परंतु आता आदिवासी भागात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने या रानमेवाच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.• या भागातील करवंदे मुंबई, कल्याण, नाशिकपर्यंत पोहोचतात, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाटेल त्या भावात करवंदे खरेदी करून विक्री करतात. तर लहान बालके व वृद्ध महिला पळसाच्या पानांचे द्रोण भरून दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून करवंदांची विक्री करतात.

करवंद हे फळपिक शेतीला कुंपण म्हणून बऱ्याच ठिकाणी घेतले जाते. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी करवंद पिकावर संशोधन करून नवीन वाण तसेच त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवितात याविषयी अभ्यास करून ते शेतकऱ्यांपर्यंत जात आहे. कमी पाण्यात कोरडवाहू करवंदाची शेती हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.

टॅग्स :शेतकरीशेतीफळेपीककोकणआरोग्य