पुणे : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आता खरिपातील ई-पीक पाहणी अर्थात सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही पीक पाहणी करता येणार आहे. या अॅपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एका सहायकाची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर हे सहायक उर्वरित क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करणार आहेत.
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामापासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपद्वारे संपूर्ण राज्यात लागू केली आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलद्वारे अॅपच्या माध्यमातून सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी १ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
यासाठी अॅपचे व्हर्जन ४.०.० अद्ययावत केले असून, गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करून घ्यावे.
खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी १४ सप्टेंबरपर्यंत तर सहायक स्तरावरील पीक पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सहायकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी.
पीक पाहणीदरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहायक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. - सरिता नरके, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान कक्ष, भूमी अभिलेख विभाग, पुणे
अधिक वाचा: ऊस लागवड करताय? ८६०३२ पेक्षा जास्त उत्पादन व साखर उतारा देणारी 'ही' जात निवडा