Join us

E Peek Pahani : ई-पीक पाहणी करायची राहून गेली काळजी करू नका; हा आहे अजून एक पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:09 IST

राज्यात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील पिकांची नोंदणी अर्थात ई-पीक पाहणीची मुदत बुधवारी संपली असून आतापर्यंत ३२ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झाली आहे.

पुणे : राज्यात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील पिकांची नोंदणी अर्थात ई-पीक पाहणीची मुदत बुधवारी संपली असून आतापर्यंत ३२ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झाली आहे.

आता सहायकांच्या स्तरावरील पाहणी गुरुवारपासून २८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा राज्य सरकारनेरब्बी हंगामातील शंभर टक्के लागवड क्षेत्राची पीक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या पीक पाहणीत चुकलेल्या नोंदीची दुरुस्ती २८ फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. रब्बी हंगामातील लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी राज्य सरकारने डिजिटल क्रॉप सर्व्हे हे अॅप उपलब्ध करून दिले आहे.

ही पाहणी शेतकऱ्यांच्या स्तरावर १ डिसेंबरपासून बुधवारपर्यंत (दि. १५) करण्यात आली. राज्यात त्यानुसार २ कोटी ९ लाख ४८ हजार ७३५ हेक्टर इतके क्षेत्र असून त्यापैकी ३० लाख ४३ हजार ३६६ हेक्टरवरील लावगड केलेल्या पिकांची नोंद करण्यात आली आहे.

तसेच कायम पड असलेले ८१ हजार ६३४ हेक्टर क्षेत्र तर चालू पड असलेले १ लाख ३ हजार ३१ हेक्टर क्षेत्रही यात नोंदविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण ३२ लाख २८ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी अर्थात नोंदणी पूर्ण झाली आहे.

एकूण लागवड क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण १५.४१ टक्के इतके आहे. शेतकऱ्यांच्या स्तरावरील पीक पाहणी संपल्यानंतर आता सहायक हे उरलेल्या क्षेत्राची पीक पाहणी करणार आहेत.

पुढील ४५ दिवस ही नोंदणी होणार असून ज्या शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केलेली नाही, अशांनी ही नोंदणी सहायकांमार्फत करावी, असे आवाहन ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या संचालक सरिता नरके यांनी केले आहे.

यंदा राज्यात असलेल्या सर्व १०० टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंतच्या नोंदणीत ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी चुकली असेल, अशांनाही आता त्यात दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून अशा शेतकऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. ही केलेली पीक पाहणी आता महाभूमी या संकेतस्थळावरील आपली चावडी या पोर्टलवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. झालेल्या नोंदणीची खात्री करण्यासाठी या पोर्टलचा वापर करावा. - सरिता नरके, संचालक, ई-पीक पाहणी, भूमी अभिलेख

टॅग्स :शेतकरीशेतीपीकमहसूल विभागसरकारराज्य सरकारपुणेरब्बी