शेतात काम करतांना शेतकरी बांधवांना अनेकदा वादळ वाऱ्यात धूळ, माती यांच्या फुफाट्यात काम करावे लागते. परिणामी अशावेळी कानात विविध मातीचे, धुळीचे कण जाऊन त्यातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या शरीरात कान हा एक महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. त्यामुळे कानाचं आरोग्य टिकवणं फार गरजेचं आहे. योग्य काळजी घेतली नाही तर ऐकण्यात अडचण, वेदना किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
अशावेळी कानाचे आरोग्य जपण्यासाठी काय करावे? काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या विशेष लेखातून.
कानातील मळ म्हणजे घाण नव्हे!
आपल्या कानात तयार होणारा मळ (earwax) काही घाण नाही तर एक नैसर्गिक सुरक्षा कवच आहे. तो कानातल्या धुळीपासून, बॅक्टेरियापासून आणि लहान कीटकांपासून कानाचं संरक्षण करतो. कानातले बारीक केसही बाहेरच्या घाणेला आत जाण्यापासून अडवतात. त्यामुळे हा मळ जबरदस्तीने काढण्याची गरज नसते.
बड वापरणं टाळाच!
बरेच लोक कान साफ करण्यासाठी बाजारात मिळणारे बड किंवा काड्या वापरतात. ही सवय खूपच घातक ठरू शकते. अशा वस्तूंमुळे कानातील मळ अजून आत ढकलला जातो आणि कधी कधी कानाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते. त्यामुळे ऐकण्यात अडचण येणे, खाज येणे किंवा वेदना होण्याची शक्यता वाढते. यामुळेच बड वापरणं टाळावं.
कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
कानात काही अडथळा जाणवत असल्यास कोणतेही ड्रॉप्स, तेल किंवा घरगुती उपाय स्वतःहून करु नका. डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच योग्य ठरतं. कानात वारंवार खाज येत असेल, वेदना जाणवत असतील किंवा ऐकण्यात अडचण येत असेल तर ही लक्षणं दुर्लक्षित न करता ENT (कान-नाक-घसा) तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
शेतकरी बांधवांसाठी खास सल्ला
शेतामध्ये माती, धूळ आणि ट्रॅक्टर किंवा पंपसेटसारख्या मोठ्या आवाजाच्या मशीनमुळे कानावर सतत ताण येतो. अशा ठिकाणी काम करताना शक्य असल्यास कान झाकणारे इयरप्लग किंवा कापड वापरावं, जेणेकरून धूळ थेट कानात जाऊ शकणार नाही. तसेच दररोज आंघोळ करताना कानाबाहेरचा भाग सौम्य पद्धतीने पाण्याने धुवून घ्या. पण कानाच्या आत पाणी जाऊ देऊ नका.
लहान मुलांमध्ये अधिक काळजी घ्या
लहान मुलांचे कान फारच नाजूक असतात. त्यांच्या कानात कोणतंही तेल, औषध किंवा बड वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चुकीचा उपाय केल्यास ऐकण्यावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.
कानात बड, काड्या किंवा तेल वापरणे धोकादायक ठरू शकते. यामुळे कानात सूज, संसर्ग किंवा ऐकण्यात अडथळा निर्माण होतो. कानाची स्वच्छता ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य पद्धतीनेच करावी. - डॉ. पराग डोईफोडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, अकोला.