Join us

Cotton Farming चिंता करू नका, कापसाच्या १० लाख पाकिटांची गरज; उपलब्ध होणार १३ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:12 PM

९ खासगी कंपन्यांचे १२५ प्रकारचे कपाशी वाण येतील बाजारात

शिरीष शिंदे

अंदमान-निकोबार बेटावर मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना बियाणे कमी पडणार नाहीत याची पूर्ण खात्री झाली आहे.

प्रस्तावित पेरणीनुसार बीड जिल्ह्यास संकरित कपाशी बियाणांच्या १० लाख ५२ हजार पाकिटांची आवश्यकता आहे; परंतु जिल्हा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन करून १३ लाख २७ हजार संकरित कापूस बियाणांची मागणी केली आहे. त्यानुसार बाजारात बियाणे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.

खरीप हंगामाची तयारी प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच केली जाते. त्यामध्ये प्रस्तावित क्षेत्र, खते बियाणांची आवश्यकता, मागील वर्षात किती पेरणी झाली, त्यानुसार उत्पादन किती झाले याचा आढावा घेऊन सर्व नियोजन केले जाते. खरीप हंगामात ऐनवेळी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

दरम्यान, बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, तर आगामी जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागाने ८ लाख १ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. या माध्यमातून १४ लाख ४६ हजार उत्पादन अपेक्षित आहे.

सर्वसाधारणपणे पाहिले तर सोयाबीन व कापसाची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे या दोन्ही बियाणांची मागणी वाढणे स्वाभाविक आहे. जिल्हा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन करून १३ लाख २७ हजार संकरित कापूस बियाणांची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा बाजारात कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांची धावपळ टळणार आहे.cotton farming

विशिष्ट वाणाचा आग्रह नको

शेतकऱ्यांना गरजेपेक्षा सव्वापट बियाणे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. - बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

४९ कंपन्यांचे १२५ वाण बाजारात

■ कृषी दुकानांमध्ये ४९ कंपन्यांचे १२५ वाण बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकाच बियाणावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

■ काही कंपन्यांचे वाण पाऊस खंडित झाला तरी पाते गळून पडत नाहीत असा समज आहे; परंतु उत्पादनात फार काही फरक पडत नाही. त्यामुळे एकाच वाणाचा आग्रह न धरता उपलब्ध बियाणे वापरणे आवश्यक आहे.

■ तसेच चांगला पाऊस झाला तर नामांकित कंपन्यांच्या बियाणांपेक्षा इतर कंपन्यांचे बियाणे अधिक उत्पन्न देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाशिवाय पेरणी नको

बियाणे विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या ४९ कंपनींच्या १२५ पेक्षा जास्त वाणांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. सर्व वाण चांगले उत्पादन देणार असून शेतकऱ्यांनी विशिष्ट कंपनीच्या वाणाचा आग्रह धरू नये तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करू नये अशा सूचना शासनाच्या आहेत. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय बियाणांची पेरणी करू नये. कमी पावसावर लागवड केल्यास उगवण कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते. - एस. डी. गरंडे, कृषी विकास अधिकारी, जि. प. बीड.

हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

टॅग्स :कापूसपीक व्यवस्थापनशेतकरीशेतीबीडमराठवाडाविदर्भशेती क्षेत्रखरीप