Join us

फवारणीच्या वेळी करू नका हलगर्जीपणा बनू शकतो जीवघेणा; कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:39 IST

विषयुक्त कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेने करावी, शिवाय उपाशीपोटी फवारणी करू नये, अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता आहे.

विषयुक्त कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेने करावी, शिवाय उपाशीपोटी फवारणी करू नये, अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात तणनाशक व कीटकनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका संभवतो. यापूर्वी अशा घटना घडल्या असून, फवारणीदरम्यान दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अनेक भागांत पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी करण्याची धामधूम सुरू झाली आहे.

कीटकनाशक फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्यास विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

तणनाशक फवारणीचा पंप कधीही कीटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरू नये. कीटकनाशकाचा चुकूनही वास घेऊ नये. मिश्रण तयार करताना हातमोजे वापरावे व तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

फवारणी करताना अंग झाकलेले असावे, पंपाचे कीटकनाशक अंगावर पडणार नाही. पाऊस येण्याआधी किंवा पावसानंतर लगेच फवारणी नोझल शरीरापासून दूर ठेवावे.

फवारणीचे कपडे व वस्तू इतर कामासाठी वापरू नये, फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे, धूम्रपान करणे टाळावे, फवारणीचे काम आठ तासांवर करू नये, फवारणी करतेवेळी अशक्तपणा व चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, पाणी येणे, अंधूक दिसणे, तोंडातून लाळ येणे, तोंडाची आग होणे, असा त्रास असल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.

फवारणी करताना अशी घ्यावी काळजी

कीटकनाशकांचे मिश्रण लाकडी काडीने मिसळा. फवारणीवेळी हातमोजे, बूट, मास्क, चष्मा वापरा. औषध अंगावर उडाल्यास त्वरित धुवा. तार/टाचणीने नोझल स्वच्छ करा. फवारणीनंतर अंघोळ करा आणि कपडे धुवा.

फवारणी करताना काय करू नये?

उपाशीपोटी फवारणी नको. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी टाळा. धूम्रपान, अन्नपदार्थ वापर टाळा. रिकामे डबे पाण्यासाठी वापरू नका. विना जोड्याने फवारणी टाळा.

विषबाधा झाल्यास काय कराल?

• तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात जा. १०८ या टोल फ्री क्रमांकावर ॲम्ब्युलन्ससाठी संपर्क साधावा, रुग्णाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. खरीप हंगामात कीटकनाशक फवारणी करताना खबरदारी आवश्यक आहे.

• योग्य तंत्र, योग्य साहित्य आणि वैयक्तिक सुरक्षेची जाणीव ठेवावी, असे कृषी विभागाने सांगितले. उपाशीपोटी फवारणी करू नका, अन्यथा विषबाधेचा धोका असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

लाल रंगाचा मार्क अत्यंत विषारी

लाल रंगांची खूण असल्यास - अत्यंत विषारी.

पिवळ्या रंगांची खूण असल्यास - मध्यम विषारी.

निळ्या रंगांची खूण असल्यास - कमी विषारी.

हिरव्या रंगांची खूण असल्यास- सौम्य विषारी.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणपीक व्यवस्थापनआरोग्य