Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळ शेतीतून देवगडला मिळतेय आर्थिक उन्नतीची दिशा; मत्स्यसंपदा योजनेतून मिळाला उत्पन्नाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:55 IST

कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्याने नटलेल्या देवगड तालुक्यात पारंपरिक मत्स्य व्यवसाय आणि हापूस आंब्याच्या उत्पादनाबरोबरच आता एक नवा, शाश्वत आणि उत्पन्न वाढीचा पर्याय म्हणून समुद्र शेवाळ शेती वेगाने उदयास येत आहे.

अयोध्याप्रसाद गावकर

कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्याने नटलेल्या देवगड तालुक्यात पारंपरिक मत्स्य व्यवसाय आणि हापूस आंब्याच्या उत्पादनाबरोबरच आता एक नवा, शाश्वत आणि उत्पन्न वाढीचा पर्याय म्हणून समुद्र शेवाळ शेती वेगाने उदयास येत आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि केंद्रीय मीठ व सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग परिसरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने यशाची नवी दिशा दाखवली असून, स्थानिक मच्छीमार व शेतकऱ्यांसाठी आर्थिक क्रांतीची दारे खुली केली आहेत.

तांबळडेग समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ८ ते १० वाव अंतरावर अंदाजे दीड हेक्टर समुद्र क्षेत्रात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही शेवाळ शेती करण्यात आली आहे. समुद्राच्या पाण्यात विशिष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेवाळाची लागवड करून काही महिन्यांतच उत्पादन मिळविण्याचा हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे.

या प्रकल्पामुळे 'समुद्रातील शेती' ही संकल्पना केवळ कल्पनेत न राहता प्रत्यक्षात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपक्रमात स्थानिक शेतकरी व मच्छीमार शेखर राणे, यश मालडकर, मंदार सनये आणि मारुती धुवाळी यांनी पुढाकार घेतला.

विशेषतः शेखर राणे यांनी या प्रकल्पासाठी सातत्यपूर्ण परिश्रम घेत, स्थानिकांना एकत्रित करून या शेतीचा पाया भक्कम केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज हा प्रकल्प इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या शेतीच्या यशामागे केंद्रीय मीठ व सागरी रसायन संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. अरुष घोष, डॉ. मोनिका कवळे आणि अनिल पावशे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

त्यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शेवाळाची निवड, लागवड पद्धती, देखभाल आणि काढणी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यामुळे स्थानिकांनी अत्यल्प कालावधीत ही शेती आत्मसात केली आहे.

शेवाळाचा वापर सेंद्रिय खत, औषधनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने तसेच खाद्यपदार्थ घट्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेषतः शेवाळापासून तयार होणारे सेंद्रिय खत पिकांची पोषण शोषण क्षमता वाढवते, जमिनीची सुपीकता सुधारते, तसेच बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या अजैविक ताणाचा सामना करण्यास पिकांना सक्षम बनवते. परिणामी उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन गुणवत्ता ही सुधारते.

उत्पादित शेवाळासाठी ठोस बाजारपेठ उपलब्ध होणे ही या उपक्रमाची मोठी जमेची बाजू ठरली आहे. 'क्लायमा क्यू' या कंपनीकडून शेतकऱ्यांकडील शेवाळाची हमीभावाने खरेदी केली जात आहे.

याशिवाय कंपनीकडून प्रशिक्षण, तांत्रिक सहाय, शेवाळाचे बीज उपलब्ध करून देणे आणि उत्पादन खरेदी अशी सर्वसमावेशक मदत दिली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

नवसंजीवनी देणारा क्रांतिकारी उपक्रम

एकूणच, समुद्र शेवाळ शेती ही देवगड तालुक्यासाठी केवळ एक पर्यायी व्यवसाय न राहता आर्थिक उन्नती, शाश्वत विकास आणि कृषी क्षेत्रातील नवसंजीवनी देणारा क्रांतिकारी उपक्रम ठरत आहे.

आगामी काळात या उपक्रमामुळे देवगडची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठळकपणे निर्माण होईल, यात शंका नाही.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळकटी

देवगड तालुक्यातील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये, हुर्शी, कलंबाई, पडवणे, फणसे, मिठबाव, कातवण, तांबळडेग, हिंदळे, मुणगे, पोयरे, मिठमुंबरी, कुणकेश्वर, मोर्वे आदी किनारी गावांना या शेतीमुळे नवा आर्थिक पर्याय उपलब्ध झाला आहे.

पारंपरिक व्यवसायांबरोबरच समुद्र शेवाळ शेतीमुळे उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे.

योग्य नियोजन, शासनाच्या सहकार्याची गरज

यंदाच्या हंगामात केवळ सुमारे दहा टक्केच आंबा उत्पादन झाल्याने शेतकरी चिंतेत असताना, समुद्र शेवाळ शेती आणि त्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत है देवगड हापूसला 'संजीवनी' देणारे ठरू शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि आंबा उत्पादन या पारंपरिक ओळखीबरोबर आता देवगड तालुका समुद्री शेवाळ शेतीसाठी ही ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत शेवाळ शेती आहे. योग्य नियोजन, शासनाचे सहकार्य आणि स्थानिकांचा सहभाग यामुळे ही शेती भविष्यात मोठ्या प्रमाणावर विस्तारू शकते.

हेही वाचा : रेशीम शेतीतून घोराडच्या विवेकरावांनी साधली आर्थिक प्रगती; जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर लाखोंचे उत्पन्न

English
हिंदी सारांश
Web Title : Seaweed farming boosts Devgad's economy through fisheries scheme, creates income source.

Web Summary : Devgad's coastal region sees economic upliftment through seaweed farming, supported by a central fisheries scheme. This initiative provides a sustainable income source for local fishermen and farmers, improving livelihoods and agricultural practices with innovative techniques and expert guidance.
टॅग्स :सिंधुदुर्गपाणीमच्छीमारमच्छीमारशेती क्षेत्र