Join us

भाव चांगला मिळूनही फूल उत्पादकांचे हात रिकामेच; तापमानाने उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 14:36 IST

कडक उन्हात झेंडूच्या फुलाची कळी उमलेनासी झाली आहे.

धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहचला असून, याचा परिणाम फूल उत्पादनावरदेखील होताना दिसत आहे. कडक उन्हात झेंडूच्या फुलाची कळी उमलेनासी झाली आहे. बाजारात झेंडू फुलाला ६० ते ८० रुपये प्रति किलो असा भाव मिळत असला तरी उत्पादनात ८० टक्के घट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच असल्याचे दिसत आहे.

तुळजापूर तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने डिसेंबर महिन्यात तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. उन्हाळी पिके पाण्यावर घेण्याचे प्रमाण पाण्याअभावी नगण्य झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील तरुण शेतकरी इंद्रजित घोटकर यांनी विहिरीतील पाण्याच्या भरवशावर एक एकर काळरान जमिनीत सात हजार प्राइम ऑरेंज जातीच्या झेंडू रोपाची लागवड केली होती. यासाठी त्यानी लाखभर रुपये खर्च केला.

लागवड केलेल्या रोपांना पाण्याचे ठिबक सिंचनाद्वारे योग्य नियोजन करून ती रोपे ४२ अंशाच्या तापमानातही जगविली. फुले लगडण्याचा मौसम चालू झाला तसा बाजारामध्ये फुलाच्या भावातही वाढ झाली. सध्या प्रति किलो ६० ते ८० रुपये भाव मिळतो आहे. यामुळे फुलाचे चांगले उत्पन्न होईल, अशी आशा त्यांना होती.

दरम्यान, मार्च महिन्यापासुन तापमात ४२ अंशांपर्यंत वाढ झाल्याने एक एकर क्षेत्रात दिवसाकाठी एका तोड्याला सातशे किलो फुलाचा तोडा निघायचा तिथे १५० किलो फुलाचे उत्पादन निघत आहे. कडक उन्हामुळे झेंडू फुलाची कळीही उमलत नसल्याचे दिसत आहे.

एकूणच उत्पादनात जवळपास ८० टक्के घट झाली असून, कडक उन्हात तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली झेंडू फुलांची बाग शेतकऱ्यांना नुकसानीत आणणारी ठरत आहे. त्यात चिनी प्लॅस्टिक फुलांनी बाजारपेठेत झेंडू फुलावर अतिक्रमण केल्याने झेंडू फुलांची क्रेझ कमी झाल्याची खंत शेतकरी इंद्रजित घोटकर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड

टॅग्स :उष्माघातफुलंशेतीशेतकरीमराठवाडाबाजार