पुणे : राज्य सरकारने चालू वर्षापासून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पिक विमा अर्ज भरायचा असेल तर ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला फार्मर आयडी अनिवार्य केला आहे.
फार्मर आयडी दिल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांची गरज शेतकऱ्यांना लागणार नाही पण महाडीबीटी पोर्टल अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातबारा व आठ-अ ची मागणी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात कृषी संचालकांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले असून शेतकऱ्यांनी फार्मर आयडी दिल्यानंतर इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांनी करू नये असे आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी दिला आहे त्या शेतकऱ्यांना कोणतेही कागदपत्र देण्याचे गरज लागणार नाही.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना कृषी आयुक्त डॉ. सुरज मांढरे यांनी सांगितले की, "काही दिवसांपूर्वी आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांकडून या कागदपत्रांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांमध्ये गोंधळ नको म्हणून हे प्रसिद्ध पत्र काढले आहे."
फार्मर आयडी काढा
यंदाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजना किंवा इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेतला नसल्याने लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणी करावी आणि इतर योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांची उसाची बिलं कारखान्यांनी दिली नाहीतर केली जाणारी आरआरसी कारवाई म्हणजे काय? वाचा सविस्तर