पुणे: दस्त नोंदणी कार्यालयांवरील भार लक्षात घेता १ ते ३१ मार्चदरम्यान राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे.
नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी परिपत्रक जारी केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट होते.
यंदा हे उद्दिष्ट ५५ हजार कोटी रुपये आहे. फेब्रुवारीत राज्यात ४८ हजार ९९५ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे उत्पन्न ८९ टक्के आहे.
त्यातून राज्यात सुमारे २५ लाख एवढी दस्तनोंदणी करण्यात आली. पुढील महिनाभरात आणखी ७ हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे विभागापुढे उद्दिष्ट आहे.
मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी व्हावी, यासाठी १ ते ३१ मार्चदरम्यान तीनशेहून अधिक दुय्यम निबंधक कार्यालयांच्या वेळांमध्ये दोन तासांनी वाढ करण्यात आली आहे.
सद्यःस्थितीत सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालये सुरू असतात. मात्र, आता दोन तासांनी वाढ केल्याने ही कार्यालये रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा: शेतजमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद आता थांबणार; भूमिअभिलेख विभागाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय