Join us

Dalimb Niryat Nondani : डाळिंब निर्यातीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:25 IST

सांगोला: डाळिंब निर्यातीसाठी राज्यातील ७ जिल्ह्यांसह सांगोला तालुक्यातून २१ हजार २९५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

सांगोला: डाळिंब निर्यातीसाठी राज्यातील ७ जिल्ह्यांसह सांगोला तालुक्यातून २१ हजार २९५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

यामध्ये सर्वाधिक सांगोला तालुक्यातील ५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अनार नेटवर ऑनलाइन नोंदणी करत सहभाग नोंदविला असल्याची माहिती अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी दिली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून डाळिंब फळबागा नैसर्गिक आपत्तीमुळे धोक्यात आल्या असून, परिणामी डाळिंबाच्या उत्पादनातही घट होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाला अपेक्षित दर मिळत असल्यामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत.

गतवर्षी डाळिंबाची निर्यात वाढल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. देशातून सर्वाधिक डाळिंब निर्यात महाराष्ट्रातून प्रामुख्याने युरोपियन देश सौदी अरेबिया, श्रीलंका आणि थायलंड यासह बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड या देशात केली जाते.

दरम्यान, डाळिंबाला पोषक वातावरण असल्यामुळे बागा सेटिंग होण्यास अडथळे निर्माण होतात. यंदा डाळिंब निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली आहे.

आतापर्यंत २१ हजार २१५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश असून, त्या खालोखाल सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद केली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीत पुढे येत आहेत ही बाब अत्यंत चांगली असल्याचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी सांगितले.

डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून सांगोला तालुक्याची जगभर ओळख आहे. त्यामुळे निर्यातक्षम डाळिंब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. विविध राज्यातील व्यापारी थेट सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन निर्यातक्षम डाळिंबाची खरेदी करून विविध राज्यांतील बाजारपेठेत तसेच देशभरात निर्यात करीत आहेत. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यामुळे डाळिंबाला चांगला दर मिळतो. याचा फायदा शेतकऱ्यांनाच होत आहे. - सतीश पाटील, डाळिंब उत्पादक शेतकरी, चोपडी, ता. सांगोला

सांगोला तालुक्यात सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड असून, आजमितीला बागा सुस्थितीत आहेत. राज्य शासनामार्फत डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची जिल्हास्तरीय प्रक्षेत्र भेट व शेतकऱ्यांसमवेत चर्चा करून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. - दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी सांगोला

अधिक वाचा: लाटवडेच्या शंकर पाटलांनी ऊस शेतीत केला ५५ कांड्याच्या उसाचा नवा रेकॉर्ड.. वाचा सविस्तर

टॅग्स :डाळिंबशेतीशेतकरीसरकारराज्य सरकारफलोत्पादनफळेसोलापूर