Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशात ३२५ कारखान्यांचे गाळप सुरू; यंदा किती साखर उत्पादन होणार? काय आहे अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:58 IST

sugarcane crushing देशात नवीन ऊस गाळप आणि साखर उत्पादन हंगामास सुरुवात झाली असली, तरी यंदा मान्सून लांबल्याने उभ्या उसाचे वजन वाढण्याची शक्यता आहे.

पुणे : देशात नवीन ऊस गाळप आणि साखर उत्पादन हंगामास सुरुवात झाली असली, तरी यंदा मान्सून लांबल्याने उभ्या उसाचे वजन वाढण्याची शक्यता आहे.

परिणामी गाळप वाढून साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी २९३ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा त्यात सुमारे ५७ लाख टन वाढ (१६ टक्के) होऊन ते ३५० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तर इथेनॉलसाठी ३५ लाख टन साखर वळविली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

गाळप हंगामाच्या पहिल्या पंधरवड्याचा अहवालानुसार ३२५ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत देशातील १४४ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते.

परिणामी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा याच कालावधीत १२८ लाख टन ऊस गाळपातून १० लाख ५० हजार टन नवीन साखर उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ८.२ टक्के मिळाला आहे.

गेल्यावर्षी ९१ लाख टन उसाचे गाळप होऊन ७ लाख १० हजार टन साखर आणि ७.८ टक्के साखर उतारा मिळाला होता. यंदा नवीन गाळप हंगाम उशिरा सुरू झाला असला, तरी यंदा एकूण नवीन साखर उत्पादन ३५० लाख टन होण्याचा अंदाज आहे.

त्यात महाराष्ट्रात १२५ लाख टन, उत्तर प्रदेशात ११० लाख टन आणि कर्नाटकात ७० लाख टन उत्पादन होण्याचे अपेक्षित आहे.

निर्यातीच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. गेल्या सहा वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री किमतीत काहीही बदल न झाल्यामुळे आणि गेल्या तीन वर्षापासून इथेनॉल खरेदी किमती स्थिर आहेत. त्यामुळे कारखान्याचे बजेट कोलमडले. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ

महासंघाने तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. साखरेचे किमान विक्री दर हे सध्याच्या कारखाना स्तरावरील विक्री दराच्या पातळीवर निश्चित करणे, साखर उद्योगातून तयार होणार्या इथेनॉलच्या दरात वाढ करणे आणि या इथेनॉलच्या कोट्यामध्ये वाढ करणे. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, महासंघ

अधिक वाचा: बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बिबट्यांच्या नसबंदीला केंद्रीय वन मंत्रालयाची मान्यता

English
हिंदी सारांश
Web Title : India's Sugar Production Expected to Rise Significantly This Year

Web Summary : India's sugar production is projected to reach 350 lakh tonnes this year, a 16% increase from last year. Delayed monsoon is expected to increase sugarcane weight. 325 factories have started crushing, yielding 1.05 million tonnes of sugar with an 8.2% recovery rate. Maharashtra, Uttar Pradesh, and Karnataka are expected to be top producers.
टॅग्स :साखर कारखानेऊसमहाराष्ट्रकाढणीउत्तर प्रदेशकर्नाटककेंद्र सरकारमोसमी पाऊस