Join us

Crop Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:55 IST

मराठवाड्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना या आठवाड्याचा कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Crop Advisory)

Crop Advisory : मराठवाड्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना या आठवाड्याचा कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवसात आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.  

मराठवाड्यात येत्या तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : 

पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने या आठवाड्याची कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

* वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. तुर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ५ % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस २५% २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. * फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास आवश्यकतेनुसार हलके पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी पहिली कोळपणी करावी.* लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.  फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. * बागायती गहू उशीरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते. उशीरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. गव्हाची पेरणी करतांना १५४ किलो १०:२६:२६ + युरिया ५४ किलो किंवा ८७ किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया ५३ किलो + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ८७ किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट २५० किलो + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. * राहिलेले अर्धे नत्र ८७ किलो युरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे. रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबरपर्यंत करता येते पेरणी ६० X ३० सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. 

* मका पेरणी करतांना ७५ किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि ७५ किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्यांनी द्यावे, याकरिता २८९ किलो १०:२६:२६ + युरिया १०० किलो किंवा ५०० किलो १५:१५:१५ किंवा ३७५ किलो २०:२०:००:१३ किंवा युरिया १६३ किलो + ४६९ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १२६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि १६३ किलो युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महिन्यांनी द्यावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

* केळी बागेत खतमात्रा दिली नसल्यास ५० ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा देण्यात यावी. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. आंबा बागेत माल फार्मेशनचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एनएएची फवारणी करावी. 

* आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

* द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.  पुर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

रब्बी हंगामात लागवड केलेला भाजीपाला पिकात खुरपणी करून पीक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.

फुलशेती

लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पुर्ण उमलल्याच्या नंतर करावी. फुल पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या ऋतूमानानुसार व हवामान बदलानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.त्यासाठी थंडीपासून/ थंड तापमानापासून/ थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षणासाठी खिडकी व दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत. पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी काड/ पेंढा/ मॅट वापरून जमिनीतील थंडावा कमी करावा. दिवसा सूर्य प्रकाशात सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन