राज्यात सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाने कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी १६२ किलोंची एक गाठ आता १७० किलोंची होईल असा नवा अंदाज भारतीय कॉटन असोसिएशनने जाहीर केला आहे. राज्यनिहाय कापूस (प्रेसिंग) दाबाच्या या अंदाजात काही बदल करण्यात आले आहेत.
भारतीय कॉटन असोसिएशनने २०२२-२३ हंगामासाठी पीक उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. यात महाराष्ट्र, पंजाब, गुजरात , तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थानच्या मागील अंदाजाच्या तुलनेत कापूस दाबाच्या अंदाजात वाढ करण्यात आली आहे.
कॉटन असोसिएशनने कापूस हंगामाच्या अखेरपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत १६२ किलोच्या ३१८.९० लाख गाठी होतील असा अंदाज वर्तवला होता.मात्र, आता १७० किलोंच्या ३५५.४० लाख गाठी होतील असा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात १७० किलोंच्या ७१,००० गाठी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत भारतीय कॉटन असोसिएशनने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कापूस दाबाच्या आकड्यांचा अंतिम अंदाज सादर करण्यात आला.या बैठकीस कापूस उत्पादक प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे २० सदस्य उपस्थित होते.
आयात निर्यातीचे अंदाज काय?
भारतात २०२२-२३ या हंगामामध्ये १७० किलोच्या १२.५० लाख कापसाच्या गाठींची आयात होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २.५० लाख गाठींनी ही आयात कमी आहे.
चालू हंगामात १५.५० लाख गाठी कापूस निर्यातीचा अंदाज असून २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत २७.५० लाख अधिक निर्यात होईल असा अंदाज आहे.
भारताचे अर्थचक्र बदलू शकणाऱ्या कापूस या पीकावर आयात निर्यात तसेच देशांतर्गत व कपडा बाजाराची गणिते जोडली गेली आहेत. परिणामी व्यापारी व उद्योग जगतातील अनेकांचे कापसाच्या उत्पादनाकडे व संबंधित घडामोडींकडे लक्ष लागून आहे. हवामान बदलाने कापूस उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.