Join us

Cotton Market : कापसाची थप्पी पडतेय महागात; होत आहेत त्वचेचे आजार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:06 IST

Cotton Market: भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवला आहे; मात्र घरात कापूस साठवल्यामुळे आरोग्य व इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाचा सविस्तर

मागील तीन वर्षांपासून कापसाला बाजारात (Cotton Market) समाधानकारक भाव मिळालेला नाही. यंदाही भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) आपला कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवला आहे; मात्र घरात कापूस (Cotton) साठवल्यामुळे आरोग्य (Health) व इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे भाव वाढत नाही, तर दुसरीकडे कापूस घरात ठेवल्याने त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत अडकला आहे.

अकोला जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके असून, मोठ्या प्रमाणावर कापसाची पेरणी केली जाते. गेल्या खरीप हंगामात घेतलेल्या कापसाची वेचणी संपली असली तरी कमी भावामुळे शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवला आहे; मात्र यामुळे कुटुंबातील लहान मुले आणि वृद्धांना त्वचेचे आजार होत आहेत.

शरीराला कापसाचा स्पर्श झाला तर खाज सुटते, ज्यामुळे लहान मुले त्रस्त आहेत. तसेच मागील तीन वर्षांपासून कापसाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे हताश झालेले शेतकरी कमी भावातच कापसाची विक्री करीत आहेत.

व्यापाऱ्यांचा अंदाज : दरात वाढ होणार नाही!

व्यापाऱ्यांच्या मते, कापसाचे दर ७ हजार रुपयांच्या पुढे सरकण्याची शक्यता नाही. चार वर्षांपूर्वी मिळालेला १२ हजार रुपयांचा दर यावर्षी मिळण्याची शक्यता नाही.

साठवणुकीमुळे लहान मुले त्रस्त

कापसाचा सतत संपर्क त्वचेला झाल्यास खाज सुटण्याचा त्रास होतो. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. वयोवृद्ध नागरिकही या समस्येमुळे त्रस्त आहेत. या समस्यांमुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या अधिकच तणावाखाली आहेत.

दोन रूमचे घर; एक कापसाने पॅक

काही शेतकऱ्यांची घरे दोन खोल्यांची असून, एका खोलीत पूर्ण कापूस भरून ठेवण्यात आला आहे. परिणामी, घरातील जागा अपुरी पडत आहे.

लग्नसराईत खर्चाचा ताण, कापूस विकणे अपरिहार्य

चार वर्षांपूर्वी कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता, जो नंतर ९ हजार रुपयांपर्यंत घसरला. त्यानंतरच्या काळात दर सातत्याने कमी होत गेले. सध्या कापसाचे दर ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिरावले आहेत. कुटुंबातील लग्नसराईच्या खर्चामुळे काही शेतकऱ्यांना आता कापूस कमी भावात विकणे भाग पडत आहे.

उंदीर आणि विस्तवाचा धोका

* घरात कापूस साठवून ठेवणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. कापसाला सहज आग लागण्याची शक्यता असल्यामुळे घरातील इलेक्ट्रिक उपकरणे दूर ठेवावी लागतात.

* ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कापूस साठवलेल्या खोलीत दिवा लावणेही शक्य होत नाही. याशिवाय, उंदरांचा उपद्रव वाढत असून, ते कापसाचे नुकसान करतात.

* त्यामुळे उंदरांपासून कापसाचे संरक्षण करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

कापसावरील किडे स्वयंपाकघरात

कापूस दीर्घकाळ घरात साठवून ठेवण्यात आल्यास त्यामध्ये किडे होण्याची शक्यता वाढते. हे किडे संपूर्ण घरभर पसरतात. परिणामी, स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थांपर्यंत किड्यांचा शिरकाव होतो, ज्यामुळे स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संक्रांत उलटली; पण कापसाने संकट आणले!

* गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील कापसाची वेचणी आटोपली असली तरी भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.

* संक्रांतीनंतर भावात वाढ होईल, असा विश्वास होता. मात्र, सण संपल्यानंतरही कापसाच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही.

शेतकरी काय सांगतात....

'मागील दोन वर्षांपासून कापूस घरात साठवून ठेवत आहोत. यावर्षी वेचणी संपल्यावर कापसाचा साठा अधिक झाला आहे. घरात ठेवायला जागाही नाही. भाव वाढत नसल्याने अखेरीस कमी दरातच कापूस विकावा लागतो.' - प्रवीण गोरले, शेतकरी

सध्या कापूस सात हजार भावाने खरेदी केला जात आहे. मागील आठवड्यात सहा हजार रुपये भावाने विक्री करावा लागला. - अविनाश बिरारे, उत्पादक शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : शेतकऱ्यांना आशा भाववाढीची; अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीआरोग्य