महिंदळे (ता. भडगाव) परिसरात सुरुवातीपासून भिज पाऊस बरसत असल्यामुळे पावसाचे तीन महिने जमिनीतील जलपातळी खालावलेली होती. परंतु बाप्पांच्या आगमनापासून पाऊस बऱ्यापैकी पुन्हा बरसत असल्यामुळे जमिनीतील जलपातळी झपाट्याने वाढली असून, शेतात पाणी साचल्याने व जमिनीत सतत गारवा राहत आहे. त्यामुळे कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाले असून, यामुळे कपाशीच्या झाडावर बोंडेच उरली आहेत.
पूर्ण पावसाळ्यात परिसरातील विहिरी, केटीवेअर, नाले, पाझर तलाव कोरडे होते. परंतु गेल्या दहा दिवसांपासून परिसरात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने विहिरी, केटीवेअर, नाले, पाझर तलाव तुडुंब झाल्याने जमिनीतील पाणीपातळी वर आल्याने शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिकांवर रोगराई पसरली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांवर मर व लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी विहिरीतील पाणी बाहेर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. माल तयार होण्याच्या तयारीत असताना कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने आहेत तीच बोंडे फुटतील व कपाशी उपटून फेकावी लागेल. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता
• सुरुवातीपासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे व मध्यंतरी पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. त्यामुळे कपाशीत मोजकीच बोंडे तयार झाली होती.
• मक्याला कणसेही कमी तयार झाली होती. आता माल तयार होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले होते. परंतु सततच्या पावसामुळे कापसावरील फुलपाती गळून खाली पडली आहेत. जी बोंडे तयार झाली आहेत ती काळी पडत आहेत. त्यामुळे आता नवीन माल तयार होण्यासाठी अजून वेळ जाईल. त्यामुळे हंगाम लांबण्याची चिन्हे परिसरात दिसत आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून सतत पडणारा भिज पाऊस, पिकांना सूर्यदर्शन नाही, शेतात साचलेले पाणी, जमिनीतील गारवा त्यामुळे कपाशीची पूर्ण फुलपाती गळून पडली आहे. त्यात जमिनीत ओलावा असल्यामुळे पिकांवर मर व लाल्या रोगाचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे झाडावरील पाने गळून पडत आहेत. आता फक्त आहेत ती बोंडे फुटतील, त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. - भूषण धनराज देसले, शेतकरी, महिंदळे.