Join us

शेतकऱ्यांसाठी कोल्डप्रेस तेल उद्योग एक सुवर्णसंधी; कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय

By रविंद्र जाधव | Updated: September 18, 2025 14:21 IST

आजच्या आधुनिक काळात शेतीसोबत पूरक उद्योगांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून पुरेसा नफा मिळत नाही हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे.

आजच्या आधुनिक काळात शेतीसोबत पूरक उद्योगांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून पुरेसा नफा मिळत नाही हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. अशा प्रक्रिया उद्योगांपैकी “कोल्डप्रेस तेल” उद्योग हा एक उत्तम, कमी गुंतवणूक व जास्त नफा देणारा पर्याय ठरू शकतो.

लाकडी घाण्याद्वारे कोल्डप्रेस पद्धतीने तेल काढण्याची पद्धत पारंपरिक असून यात कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जात नाही. सूर्यफूल, भुईमूग, तीळ, सोयाबीन, मोहरी आदींच्या बिया थेट यंत्राच्या साहाय्याने दाबून त्यातून नैसर्गिक पद्धतीने तेल काढले जाते. या पद्धतीत तेलाचे पोषणमूल्य तसेच त्याचा नैसर्गिक स्वाद टिकून राहतो.

दरम्यान रिफाइन्ड तेल दिसायला आकर्षक असले तरी त्यात रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात. त्यामुळे आज अनेक ग्राहक आरोग्याच्या दृष्टीने कोल्डप्रेस तेलाला प्राधान्य देत आहेत. हीच संधी ओळखून शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात पिकणाऱ्या तेलबियांपासून कोल्डप्रेस तेल तयार करून स्थानिक बाजारात त्याची विक्री करावी.

हा उद्योग लघुउद्योग श्रेणीत येत असल्याने कमी खर्चात सुरू करता येतो. सुरुवातीस एक लहान कोल्डप्रेस यंत्र, थोडी जागा आणि योग्य प्रकारे स्वच्छता व पॅकिंगची सोय केली तरी हा व्यवसाय सुरु करता येतो. स्थानिक ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना कोल्डप्रेस तेलाचे फायदे समजावून सांगितल्यास ग्राहकवर्ग तयार होतो.

या तेलाचा उपयोग केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित नसून त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे त्याची मागणी फक्त ग्रामीण नव्हे तर शहरी भागातही झपाट्याने वाढत आहे. सेंद्रिय व नैसर्गिक उत्पादने हे आजचे मोठे बाजार आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा.

कोल्डप्रेस तेल उद्योग केवळ उत्पन्नवाढीसाठी नव्हे तर आरोग्यदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. यामध्ये ग्रामीण युवक, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) हे सर्व सहभागी होऊन एक नवा आर्थिक मार्ग तयार करू शकतात. आज शेतीला पूरक व्यवसायांची गरज आहे आणि कोल्डप्रेस तेल उद्योग हे त्यासाठीचे एक भरवशाचे उत्तर आहे.

या व्यवसायात प्रवेश घेण्याआधी आवश्यक प्रशिक्षण, मशीन खरेदीसाठी अनुदान, विक्री मार्गदर्शन, योजना आदींची माहिती घेणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीअन्नआरोग्यसरकारकृषी योजना