नंदुरबार जिल्ह्यात साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड होते. मात्र मिरचीचे आगार म्हणून ओळख असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अध्यापही मिरची या पिकाच्या विम्यापासून वंचित आहेत. यामुळे इतर पिकांप्रमाणेच मिरचीलाही त्यात सामावून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, यंदा मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. अति पावसामुळे देखील हे पीक उद्ध्वस्त झाले होते. जर पीक विम्यात मिरचीचा समावेश राहिला असता तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली असती असे बोलले जात आहे.
नंदुरबारसह लगतच्या धुळे जिल्ह्यात आणि गुजरातमधील तापी, नर्मदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नंदुरबारचे मिरची मार्केट हे राज्यात प्रसिद्ध आहे. स्थानिक ठिकाणी मिरचीला उपलब्ध असलेली बाजारपेठ आणि मिळणारा भाव लक्षात घेता शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतात.
परंतु शासनाच्या पीक विमा योजनेत या फळ पिकाचा समावेश नसल्याने नैसर्गिक संकट आल्यास शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. केळी, पपई प्रमाणे मिरचीलाही फळ पीक विमा योजनेत सामावून घ्यावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
अती पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान...
• यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. उघडीपही मिळत नव्हती. त्यामुळे मिरचीवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. परिणामी उत्पादन यंदा कमी आले. सरासरी उत्पादकता यंदा ६० ते ७० टक्क्यांपर्यतच राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
• जर पीक विमा राहिला असता तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळू शकली असती. दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरू राहणारा हंगाम यंदा जानेवारी महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात यंदा इतर पिकांना पीक विम्याची रक्कम मिळाली.
• परंतु मिरचीला मिळाली नसल्याने उत्पादक शेतकरी उपेक्षीत राहिला. इतर पिकांप्रमाणेच मिरचीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असतांना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई दिली गेली नाही.
• शिवाय यंदा उत्पादन कमी आणि भाव देखील जेमतेमच राहिला. त्यामुळे सर्वच बाजूंनी मिरची उत्पादक शेतकरी नाडला गेला. परिणामी आर्थिक संकटातही शेतकरी सापडला.
मिरचीच्या वाणांची होते या जिल्ह्यात लागवड
नंदुरबार जिल्ह्यात लाली, व्हीएनआर, शंकेश्वरी, फाफडा, शार्कवन या मिरचीच्या वाणांची सर्वाधिक लागवड केली जाते. बेडगी वाणाचा लागवड करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. शार्कवन व व्हीएनआरला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती आहे.
३ तालुक्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन होते. त्यात नंदुरबार, शहादा व तळोदा या तालुक्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात साडेतीन हजार हेक्टरवर लागवड...
• नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र जवळपास साडेतीन जार हेक्टरवर आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते तर नवापूर, अक्कलकुवा तालुक्यात देखील काही शेतकरी मिरची उत्पादन घेतात. विविध जातीच्या मिरचीची लागवड जिल्ह्यातील शेतकरी करतात.
• मिरचीला उष्ण व आद्रतायुक्त वातावरण लागते. शिवाय जमीन भूसभुशीत लागते. या दोन्ही बाबी जिल्ह्यात पूरक असल्याने मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. साधारणतः सप्टेंबरपासूनच मिरची उत्पादन सुरू होते. लाल मिरचीचा हंगाम मार्च, एप्रिलपर्यंत सुरू असतो.
• स्थानिक ठिकाणी बाजारपेठ असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरते. नंदुरबार हे खान्देशातील सर्वात मोठे मिरची मार्केट आहे. याशिवाय निझर आणि दोंडाईचाचे मार्केट देखील मोठ्या उलाढालीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती मिरचीला राहत आहे.
• मिरचीला पीक विम्यात सामावून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील मिरचीचे क्षेत्र, लागवड करणारे शेतकरी आणि होणारी उलाढाल लक्षात घेता याबाबत पाठपुरावा होणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी इतर पिकांकडे वळतील यात शंका नाही.