Join us

Agriculture : 'फलोत्पादन'चा पदभार आता आत्मा संचालक अशोक किरन्नळी यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 21:19 IST

संचालक मोते निवृत्त झाल्यानंतर या पदाची सूत्रे कुणाकडे येणार यासंदर्भात आयुक्तालयात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती. 

Pune : राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते हे उद्या म्हणजेच ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून या पदाचा पदभार आता आत्मा संचालक अशोक किरन्नळी यांच्याकडे देण्यात येणार आहे. संचालक मोते निवृत्त झाल्यानंतर या पदाची सूत्रे कुणाकडे येणार यासंदर्भात आयुक्तालयात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती. 

आत्मा संचालक दशरथ तांभाळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा कार्यभार अशोक किरन्नळी यांच्याकडे आला होता. यासोबतच मागील अनेक वर्षे कैलास मोते हे फलोत्पादनचा कार्यभार सांभाळत होते. यासोबतच त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या संचालक पदाचाही कार्यभार होता. ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून उद्या त्यांना पदमुक्त करण्यात येणार आहे.

कैलास मोते हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९१ साली वर्ग १ या पदावर भरती झाले होते. कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद बीड), विभागीय मृद संधारण अधिकारी जळगाव, उपविभागीय जिल्हा अधिकारी, शहादा, जि. नंदुरबार, कृषी उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाशिक, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, सहसंचालक कृषी आयुक्तालय पुणे, संचालक मृदसंधारण या पदावर आणि त्यानंतर फलोत्पादन संचालक म्हणून काम केले आहे. त्यांना शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रसार, योजना, अर्थसाहाय्य, नैसर्गिक आपत्ती यामध्ये चांगल्या कामाचा अनुभव होता.

बीडमध्ये कृषी विकास अधिकारी या पदावर काम करत असताना त्यांनी पारधी समाजातील अनेकांना शेतीकडे वळण्यास प्रवृत्त केले. पारधी समाजातील शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, बियाणे, पाईपलाईन अशा कामांना शासकीय योजनेतून मदत केली आणि भटकंतीपासून शेतीकडे वळवले. साधारण ३४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर आता ते सेवानिवृत्त होत आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणेमहाराष्ट्र