Jalna : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचे पीक कशा पद्धतीने फायद्याचे ठरू शकते, कापसाच्या उत्पादनाबरोबरच झाडाचे अवशेष मातीसाठी कसे फायद्याचे ठरू शकतात यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर व कृषि विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या वतीने विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र बदनापूर (ता. बदनापूर जि. जालना) येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीके बदनापूरचे नोडल अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. डी. सोमवंशी उपस्थित होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.एस. आर. धांडगे उपस्थित होते. तसेच
कृषी विज्ञान केंद्र बदनापूर व विशेष कापूस प्रकल्पचे उप -प्रकल्प अन्व्वेशक डॉ. आर. एल.कदम ,विशेष कापूस प्रकल्पातील प्रकल्प सहाय्यक श्री.अजित डाके व श्री.अमोल दाभाडे उपस्थित होते.
यावेळी डॉ एस. डी. सोमवंशी यांनी कार्यक्रमाचे उद्देश समजावून सांगितला. तसेच वेचणी पूर्ण झालेल्या कपाशीच्या अवशेषांचा कॉटन श्रेडरच्या साहाय्याने कट करून शेतातच गाडून जमिनीचा जैविक कर्ब वाढविण्याकरिता उपयोग करावा असा सल्ला दिला तसेच डॉ. आर. एल. कदम यांनी विशेष कापूस प्रकल्प तसेच दादा लाड तंत्रज्ञान यातील तांत्रिक बाबींवर भर टाकला.
डॉ. एस. आर. धांडगे यांनी शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान तसेच कपाशी श्रेडरच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. यावेळी प्रगतशील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यावेळी उपस्थित महिला शेतकरी भगिनींनी सघन व अतिसघन कापूस लागवडी विषयी समाधान व्यक्त केले.