'बर्ड फ्ल्यू' (Bird flu), जो एव्हियन इन्फ्लुएंझा (एच५ एन१) म्हणून ओळखला जातो. संसर्गजन्य असणारा हा रोग धाराशिव जिल्ह्यात धडकला आहे. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील दोन्ही मृत्त कावळ्यांचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे.
भोपाळ येथील प्रयोगशाळेचा हा अहवाल धडकताच प्रशासन अलर्ट झाले. तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
ढोकी पोलिस ठाणे व सुभाष देशमुख यांच्या घराच्या परिसरात २१ फेब्रुवारी रोजी कावळे मरून पडल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथक ढोकीत धडकले. दोन्ही ठिकाणांना भेट दिली असता, जवळपास ८ कावळे मृत्तावस्थेत आढळून आले.
कावळ्यांना (Crow) 'बर्ड फ्ल्यू'ची (Bird flu) लागण झाली असावी, असा संशय बळावल्यानंतर दोन कावळे तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. मृत्यू अचानक झाल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी हे दोन्ही पक्षी भोपाळ (मध्य प्रदेश) येथील प्रयोगशाळेत पाठिवले.
प्रयोगशाळेने २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला अहवाल दिला आहे. त्यानुसार दोन्ही कावळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू'ने झाल्याचे समोर आले. यानंतर पशुसंवर्धन विभागासह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.
भोपाळच्या लॅबचा अहवाल आला, चार दिवसांत ५५ कावळ्यांचा मृत्यू...
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे दगावलेल्या कावळ्यांचा अहवाल बर्ड फ्ल्यू (Bird flu) पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागासह अन्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
अलर्ट झोन घोषित...
* मृत्त कावळ्यांची संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी ढोकी पोलिस ठाणे परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे.
* २१ बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने ढोकी परिसरातील २१ कत्तलखाने (चिकन, मटन सेंटर) २१ बंद ठेवले आहेत.
पाणवठ्यांच्या ठिकाणी सर्वेक्षण
* पाहुण्या पक्ष्यांमुळे बर्ड फ्ल्यूचा प्रसार वेगाने होण्याचा धोका बळावला आहे. त्यामुळे हे पक्षी ज्या भागात भेट देतात अशा पाणवठ्यांच्या ठिकाणी गर्द झाडी, घाणीच्या वस्तीत सर्वेक्षण करून निर्जंतुकीकरणाची कार्यवाही केली जाणार आहे.
* असाधारण मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही वनविभाग करणार आहे.
* कावळ्याच्या माध्यमातून बर्ड फ्ल्यूचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याने सर्वसामान्यांसह कुक्कुटपालक धास्तावले आहेत.
अचानक मृत्यूमुळे दोन्ही पक्षी भोपाळच्या लॅबमध्ये
दोन मृत कावळे सुरुवातीला पुणे येथे पाठविले होते. मात्र, अचानक मृत्यू झाल्याने हे दोन्ही पक्षी तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.
कुक्कुट पक्ष्यांचे नमुने तपासणार
ढोकी प्रभावित क्षेत्रापासून १० किलोमीटर त्रिज्येतील सर्वच कुक्कुट पक्ष्यांचे पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
कावळ्यांचा अहवाल 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह आल्याने पोलिस ठाणे परिसर व देशमुख यांच्या घराचा आवार अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे. पुढील काही दिवस या भागात गावातील नागरिकांनी ये-जा करू नये. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अन्य यंत्रणांद्वारे उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. - यतीन पुजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, धाराशिव
शुक्रवारी आढळले मृत कावळे | ०८ |
कावळे पाठविले तपासणीसाठी | ०२ |
चार दिवसांत कावळ्यांचा मृत्यू | ५५ |
हे ही वाचा सविस्तर : Kesar Mango Export: 'केशर'च्या निर्यातीत मराठवाड्यातील १५०० आमरायांचा समावेश