Pune : धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्रगतशील शेतकरी गणेश चौधरी यांची स्थानिक कलिंगड व्यापाऱ्याने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यानेच यासंदर्भातील माहिती लोकमत अॅग्रोशी बोलताना दिली. कलिंगड व्यापाऱ्याने दर ठरल्यानंतर शेतातील कलिंगड तोडायला सांगितले पण त्यातील पाच टन माल शेतातच ठेवला. उरलेले कलिंगड घ्यायला व्यापारी न आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी गणेश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी यंदा आपल्या शेतात ६ एकर कलिंगड पिकाची लागवड केली होती. त्यावर साधारण ३ लाख ७५ हजारांचा खर्च केला होता. यावर्षी मधमाशीचं प्रमाण कमी असल्यामुळे मालही कमी लागला होता. कलिंगड तोडणीयोग्य झाल्यानंतर १८ मार्च रोजी एका स्थानिक व्यापाऱ्यासोबत २ एकर कलिंगडाचा व्यवहार झाला. यामध्ये २ किलो वजनापासून पुढचा माल ८ रूपये ५० पैसे प्रति किलोप्रमाणे घेण्याचे ठरले होते.
सदर व्यापाऱ्याने एका एकरातील अर्धा माल तोडायला लावला पण नेला नाही. माल नेण्यासाठी गाडी भेटली नाही असे कारण सांगून व्यापाऱ्याने शेतखऱ्याची फसवणूक केली आहे. शेतात उघड्यावर असल्यामुळे हा माल उन्हामुळे खराब झाला आणि त्यावर चट्टे पडून विक्रीयोग्य राहिला नाही. शेतामध्ये जवळपास ५ टन माल खराब झाला आहे. व्यापाऱ्याला फोन केला पण व्यापाऱ्याने फोन उचलणे बंद केले आहे.
दरम्यान, पुन्हा फोन केला असता सदर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांवर अरेरावी करून धमकी दिली. "तुला काय करायचं ते करून घे, माझ्यावर केस कर, मी घाबरत नाही, अशा शब्दांत धमकी दिली पण सदर व्यापाऱ्यासोबत तोंडी व्यवहार झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे सबळ पुरावे नाहीत." असं शेतकऱ्याने सांगितलं.
या व्यापाऱ्यामुळे माझे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे. कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना हे लोकं शेतकऱ्यांना फसवत आहेत. अशा व्यापाऱ्यांवर सरकारने निर्बंध घातले पाहिजेत. सदर व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांना फसवले आहे. यासंदर्भात मी धुळ्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची भेट घेतली आहे.
- गणेश चौधरी (कलिंगड उत्पादक, धुळे)