नोव्हेंबर २०२५ पासून रेशन दुकानांमध्ये गहू आणि तांदळासोबत ज्वारीचे मोफत वाटप सुरू झाले असून, दोन महिन्यांपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे.
या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यातील मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र सरकारने खरेदी केलेल्या अतिरिक्त ज्वारीचा साठा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
नियमित गहू-तांदूळ वाटपाबरोबरच प्रत्येक कुटुंबातील प्रतिसदस्य दरमहा एक किलो ज्वारी मोफत दिली जात आहे. ज्वारी हा पौष्टिक आणि पोटभरीचा अन्नघटक असल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष फायदा होत आहे.
विशेषतः भूमिहीन, मजूरवर्ग, शेतमजूर, रोजंदारी कामगार आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या वाटपामुळे दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाढती महागाई, दैनंदिन वापरातील धान्यांचे भाव वाढणे आणि रोजंदारीवर जगणाऱ्यांवरील आर्थिक ताण लक्षात घेता, अतिरिक्त एक किलो ज्वारी मिळणे, ही छोटी पण महत्त्वाची मदत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे.
यामुळे रेशन दुकानांमध्येही नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून येत आहे. लाभार्थ्यांना कोणताही अतिरिक्त अर्ज किंवा प्रक्रिया न करता नियमित रेशनसोबतच ज्वारी मिळत असल्याने समाधानाचे वातावरण आहे.
काही ठिकाणी ज्वारीच्या साठ्यात तुटवडा जाणवू नये म्हणून आगाऊ उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. दोन महिन्यांचा हा उपक्रम यशस्वी झाल्यास पुढील काळात अशा पूरक धान्यवाटपासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.
अंत्योदय गटात प्रतिकुटुंबांना गहू ८ किलो, ज्वारी ७ किलो आणि तांदूळ २० किलो देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रतिमाणसी १ किलो गहू, १ किलो ज्वारी आणि ३ किलो तांदूळ असे वाटप होणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी वाटप करायचे आहे. कार्डधारकांना पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप सुरू आहे.
पौष्टिक ज्वारी महागली; पण आता रेशनिंगवर मोफत
◼️ तीन दशकांपूर्वी ज्वारीचे दर कमी तर गहू महाग असायचा. त्यामुळे गरिबांच्या ताटात भाकरी असायची.
◼️ मात्र, ज्वारीबाबत संशोधन होऊन आरोग्याचे फायदे समोर आल्यानंतर ज्वारीला मागणी वाढली.
◼️ त्यामुळे हे भरडधान्य महागले. आता रेशनिंग दुकानातून सर्वसामान्यांनाही पांढरी शुभ्र पौष्टिक ज्वारी उपलब्ध होत आहे.
अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर
