मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?
ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'भगर' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.
भगर (Banyard Millets) बानयार्ड मिलेटस (तृणधान्य)
(इथिनोक्लोआ एस्कुलेंटा किंवा जपानी तृणधान्य व भगर)
* बानयार्ड तृणधान्य (भगर) हे एक बहुउद्देशीय पिक असून खाद्यान्न व चारा या दोन्हीसाठी त्याची लागवड केली जाते. त्याचे हिंदीमधील सर्वसाधारण नाव सावा व मराठीतील नाव शामुळ हे आहे.
* बानयार्ड तृणधान्याचे दोन प्रकार आहेत. जपानी प्रकारच्या तृणधान्याची जपानमध्ये व कोरियामध्ये आणि भारतीय प्रकाराच्या तृणधान्याची भारतामध्ये लागवड केली जाते.
* बानयार्ड तृणधान्यात प्रथिने (+१०%), पाचक तंतू (१२-१४%), आणि लोह प्रति १०० ग्रॅ. १५-१८ मिलिग्रॅम इतक्या भरपूर प्रमाणात असतात. ते मॅग्रेशियम, पोटॅशियम व जस्त यासारख्या खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे.
* बानयार्ड तृणधान्य ऑक्सिडीकरणरोधी पदार्थ तसेच थियामिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ यांचा उत्तम स्त्रोत आहे.
* ते ग्लुटेनमुक्त अन्न आहे आणि ग्लुटेनयुक्त पदार्थांची संवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय ठरु शकते.
माहिती स्त्रोत - महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे