राज्यात प्रतिबंध घातलेल्या एचटीबीटी बियाण्यांची चोरट्या मार्गाने साठवणूक करून पॅकेजिंग लेबलिंग करून विक्री करणाऱ्या कंपनीचा कृषी विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पर्दाफाश केला. ही कारवाई वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील झडशी टाकळी येथे ९ रोजी केली.
या ठिकाणाहून विविध कंपन्यांची पॅकेजिंग केलेली १४६६ पाकिटे, ११८५ किलो खुले बियाणे, तसेच अन्य साहित्य, असा ५० लाख ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गोपाल सुरेश पारटकर (रा. झडशी टाकळी) याला अटक केली आहे.
मौजा टाकळी (झडशी) येथे गोपाल पारडकर याने प्रतिबंधित असलेले बनावटी कपाशीचे बियाणे गुजरात येथून आणत साठवणूक केली. एवढेच नाही, तर कपाशी बियाणाचे पॅकिंग व लेबलिंग करून अवैधरीत्या चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली.
त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देत सेलू येथील विकासनगरात एका प्लॉटवर, टिनाचे शेड तयार केलेल्या गोडाउनवर छापा टाकला. या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील कारमध्ये बनावट कपाशी बियाणाच्या पिशव्या भरताना रंगेहात मिळून आला. गोपाल सुरेश पारडकर (३५) याला अटक केली.
पुन्हा गुजरात कनेक्शन उघड
गतवर्षी म्हसाळा परिसरात बोगस बियाण्यांचा साठा जप्त केला होता. त्यातही गुजरात कनेक्शन समोर आले होते. आता झडशी टाकळी येथे केलेल्या कारवाईत पुन्हा गुजरात कनेक्शन पुढे आले आहे. जप्त केलेला मुद्देमाल गुजरात येथील जस्सूभाई पटेल यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे. पॅकिंग व लेबलिंग केलेला मुद्देमाल वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
असा मुद्देमाल केला जप्त
• आरोपीकडून बनावटी कपाशी बियाणे भरून असलेल्या प्लास्टिकच्या २६ बॅगा, ज्यामध्ये १४६६ पाकिटे ज्यात निर्भय गोल्ड चॅलेंजर, तिलक रिसर्च कॉटन सीड्स, आरसीएच ६५९ बीजी५, कबड्डी बीजीएस, पिंक कॉटन बिग बोल ११११ कंपन्यांच्या पाकिटांचा समावेश होता.
• तसेच आरसीएच ६५९ बीजी ५, पिंक कॉटन बिग बोल कंपनीच्या नावाची रिकामी १ हजार ७२ पाकिटे, ३५ किलो वजनाच्या खुल्या बियाण्याच्या ९ बॅगा, ५० किलो वजनाच्या १७ बॅगा व २० किलो खुले कापूस बियाणे असा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या