बदलत्या काळानुसार कृषी क्षेत्रातही मोठे बदल होऊन, शेतकऱ्यांनी नवीन(New) तंत्रज्ञानाचा (Technology) अवलंब करून पीक घेण्यास सुरुवात केली आहे. पेरणी व पीक काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होत असले तरी अजूनही शेतकऱ्यांनी जुन्या काळापासून सुरू असलेल्या प्रथा- परंपरांची आज जपणूक केली जात आहे.
अकोट तालुक्यातील बागायती पट्टा अशी ओळख असलेल्या उमरा महसूल मंडळात केळीचे पीक काढणीला आले असून, शेतकऱ्यांनी केळीच्या घडांची खणा-नारळाने ओटी भरून घड उतरविण्यास प्रारंभ केला आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला उमरा महसूल मंडळाचा भाग बारमाही बागायती क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
मध्यंतरी पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बागायती क्षेत्रावर परिणाम झाला होता; परंतु आता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी झालेल्या धरणामुळे पाण्याची पातळीत वाढ झाली व पूर्वीसारखेच उमरा महसूल मंडळात बागायती क्षेत्र वाढले. त्यामध्ये संत्रा, लिंबू, पपई, पानपिंपरी व केळीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. शेतकरी केळी पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे केळी क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून केळीच्या काढणीला सुरुवात झाली आहे.
अशी केली जाते पुजा
अकोट तालुक्यातील बागायती पट्टा म्हणून ओळख असलेल्या उमरा महसूल मंडळात केळीचे पीक काढणीला आले आहे. शेतकऱ्यांनी केळीच्या घडांची खणा-नारळाने ओटी भरून घड उतरविण्यास सुरुवात केली आहे.
शेतकरी सांगतात.....
आमचे पूर्वज पिकांची पूजा करीत होते. आजही ग्रामीण भागातील शेतकरी कपाशीचा जसा सीतादही करतात, त्याचप्रमाणे केळीची नववधूप्रमाणे खणा-नारळाने ओटी भरून घड कटाईला सुरुवात करतात. पूर्वजांची परंपरा आम्ही जोपासत आहोत. - शिवा भगत, शेतकरी, पिंप्री जैन
पूर्वी आम्ही केळीचे उत्पादन घेत होतो. मध्यंतरी पाण्याच्या कमतरतेमुळे केळी पीक बंद केले होते. आता धरणामुळे पाण्याची पातळी वाढल्याने आम्ही केळीचे उत्पादन घेत आहोत. - राजेश येऊल, शेतकरी, उमरा
उमरा महसूल मंडळातील केळीला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाण्याची पातळी वाढत असल्याने आम्ही पुन्हा केळीची लागवड केली आहे. यावर्षी केळी पिकापासून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. - गजानन झुणे, शेतकरी, कोलविहीर