Pune Bamboo Festival : पुणेकरांना आता बांबूपासून बनवलेला टॉवेल, टूथब्रश, पाण्याची बाटली, बांबूची सायकल, बांबूचे सौंदर्यप्रसाधने आणि अशा अनेक वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी आली आहे. बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरने पुण्यात चार दिवसीय बांबू फेस्टिवलचे आयोजन केले आहे.
दरम्यान, पुण्यातील स्वारगेटजवळ असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बांबूपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
मागच्या काही वर्षांपासून सरकारकडून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. पण विक्री आणि विक्रीनंतरच्या प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी बांबू सोयायटी ऑफ इंडियाने हे प्रदर्शन भरवले आहे.
काय काय आहेत वस्तू?
या प्रदर्शनामध्ये बांबूपासून बनवलेले सौंदर्य प्रसाधणे, घरात लागणाऱ्या सर्व लहानमोठ्या वस्तू, हाताने बनवलेल्या वस्तू, बांबूपासून बनवलेले कपडे आणि बांबूच्या विविध उत्पादनांचा सामावेश आहे.
विशेष आकर्षण
या प्रदर्शनामध्ये तुम्हाला बांबूपासून बनवलेली भांड्याची घासणी, बांबूपासून बनवलेले मीठ, बांबूपासून बनवलेला चहा आणि बांबूची सायकल या गोष्टी पहावयास मिळणार आहेत.
किती दिवस असेल प्रदर्शन?
हे प्रदर्शन २३ जानेवारीपासून सुरू झाले असून येणाऱ्या रविवारपर्यंत म्हणजे २६ जानेवारीपर्यंत असणार आहे. स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.