मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?
ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी बाजरी या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.
बाजरी (Pearl Millets)
* आफ्रिकन व भारतीय उपखंडात इतिहासपूर्व काळापासून बाजरी पिकवली जाते.
* बाजरी एक कणखर पीक असून ते कमी पावसाच्या किंवा अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये, कमी सुपीक जमिनींमध्ये व जास्त तापमान असलेल्या क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे घेतले जाते.
* बाजरी हे खरीप पीक असून, ते रब्बी हंगामामध्ये दुबार पीक घेण्यास देखील योग्य आहे.
* भारत हा बाजरीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
मानवी खाद्यान्नाव्यतिरिक्त, ते जनावरांसाठी वैरण म्हणून देखील वापरले जाते. बाजरीच्या ताठांचा पशुखाद्यामध्येवापर केला जातो. देशात पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व तामिळनाडू ही प्रमुख बाजरी उत्पादक राज्ये आहेत.
* बाजरीचे सरासरी उत्पादन प्रति एकर ३.९ किंटल इतके आहे.
बाजरीचे आरोग्याला होणारे फायदे
* बाजरी पचण्यास हलक्या तंतुमय घटकांनी युक्त असल्यामुळे त्यास (सुपर फूडस्) सर्वोत्तम अन्नपदार्थ असे म्हणतात. वजन कमी करणे, रक्तातील मेदाचे प्रमाण कमी करणेसाठी बाजरी साह्यकारी ठरते.
* बाजरी कॅल्शियम, मॅग्रेशियम व लोह यांसारख्या खनिजांनी संपन्न असल्यामुळे एकूणच आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ती अत्यंत उपयुक्त आहे.
* बाजरी हा फॉस्फरससमृध्द स्त्रोत असून शरीरातील पेशी संरचनेतील तो एक महत्वाचा भाग आहे.
* मधुमेह नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. अधिक तंतुमयतेमुळे त्याचे पचन मंदगतीने होते व अन्य अन्नपदार्थाच्या तुलनेत कमी वेगाने रक्तात शर्करा सोडण्याचे काम करते.
* बाजरी हृदयाचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गुणवैशिष्ट्यांनी समृध्द आहे. त्यात आरोग्याच्या दृष्टीने अनावश्यक परिणाम कमी करण्याचे घटक असल्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
(माहिती संदर्भ - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे)