Join us
Daily Top 2Weekly Top 5

औराद शहाजानी, धर्माबाद परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; तोंडचा घास हिरावला जाण्याची शेतकऱ्यांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:21 IST

मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. औराद शहाजानीसह परिसरात एक आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील शहाजानीसह परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. औराद शहाजानीसह परिसरात एक आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बऱ्याच वर्षांनंतर मार्च महिन्यात एप्रिल महिन्याचे तापमान जाणवत आहे. तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचल्याने वातावरण तापले आहे. दरम्यान, अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रविवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, तगरखेडा, सावरी, हलगरा, माने जवळगा, शेळगी आदी भागात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

या पावसामुळे काढणीस आलेली रब्बी हंगामातील ज्वारी, तूर, हरभरा, करडी या पिकांसह टोमॅटो, मिरची, दोडका, भेंडी अशा भाजीपाल्याबरोबर खरबूज, द्राक्ष फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतकरी रमेश थेटे म्हणाले, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील हरभरा व बडी ज्वारीसह गहू, करडी, पपईचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसामुळे आठवडी बाजारात विक्रेत्यांची उडाली धांदल

धर्माबाद (जि. नांदेड) : रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन आठवड्यांपासून रबी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात पेरलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी, मका तसेच विविध भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. हवामान विभागाने खात्याने १७ मार्चपासून पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधीच पावसास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.

रविवारी धर्माबादचा आठवडी बाजार होता. ग्रामीण भागातून शेतकरी सकाळच्यावेळी भाजीपाला घेऊन आले होते. सकाळ व दुपारच्यावेळी आकाश निरभ्र होते. परंतु दुपारनंतर अचानक वारे सुटून विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची तसेच ग्राहकांची तारांबळ उडाली.

दोन-तीन आठवड्यांपासून अनेक शेतकरी ज्वारी व गहू कापणीच्या कामात गुंतलेले पहावयास मिळत आहेत. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसामुळे ज्वारी भिजली गेली आहे. त्यामुळे ज्वारी काळी पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

रत्नाळी शिवारात वीज पडून मुलगा जखमी, पाच मेंढ्या ठार

नांदेड जिल्ह्याच्या रत्नाळी शिवारात रविवारी विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वीज पडल्यामुळे पाच मेंढ्या ठार झाल्या असून एक मुलगा जखमी झाला आहे. बिरप्पा गंगाधर मदनुरकर (वय १७, रा. रत्नाळी) हा रत्नाळी शिवारात शेळ्या-मेंढ्या राखत होता. याचवेळी अचानक वीज पडली. जखमी बिरप्पा यास तातडीने धर्माबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तलाठी नारायण गाजेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यास शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rain, Storms Hit Aurad Shahajani; Farmers Fear Crop Loss

Web Summary : Aurad Shahajani and Dharmabad experienced unseasonal rain and storms, damaging crops like jowar, tur, and vegetables. A boy was injured by lightning in Ratnali, and five goats died. Farmers fear significant losses due to the unexpected weather.
टॅग्स :शेती क्षेत्रनांदेडलातूरपाऊसशेतीशेतकरीहवामान अंदाजपीक