हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात अडकलेली अतिवृष्टी (Ativrushti) बाधितांची मदत आता शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यापर्यंत पोहोचली असून, सव्वालाख शेतकऱ्यांनी सीएससी (CSC) केंद्रांवरून केवायसी करताच ही मदत पोर्टलवरून (Portal) खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चार महिन्यांनंतर आर्थिक मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात १ आणि २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. जमिनीही खरडून गेल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे निधीची मागणी नोंदविली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने बाधित शेतकऱ्यांची मदत अडकली होती.
निवडणुका पार पडल्या आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांसाठीच्या निधीला मंजुरी मिळाली. जिल्ह्यात २ लाख ९६ हजार ७७९ शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीने नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांसाठी ४१९ कोटी ४८ लाख २१ हजार ३०६ रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
नुकसान झाल्यानंतर चार महिन्यांनंतर मदत निधी मंजूर झाल्याने प्रत्यक्ष मदत खात्यावर केव्हा जमा होते, याची प्रतीक्षा लागली होती. बाधित शेतकऱ्यांना मदत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांचे खाते क्रमांक, मोबाइल क्रमांकासह याद्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम तहसील कार्यालयातून केले जात आहे.
२ लाख ९६ हजार ७७९ शेतकऱ्यांपैकी १ लाख २५ हजार ७७४ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी १५७ कोटी ४५ लाख ८८ हजार २२३ रुपयांची रक्कम खात्यावर जमा होणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे बंधनकारक आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत, त्यांनी सीएससी केंद्रांत जाऊन केवायसी केल्यानंतर त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्यादेखील अपलोड करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
थेट हस्तांतर प्रणालीने मदत
बाधित शेतकऱ्यांना थेट हस्तांतर प्रणालीच्या (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) साह्याने मदत वितरित केली जाते. बाधितांसाठीची रक्कम केवळ मंजूर होते. पोर्टलवर याद्या अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी केल्यास थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात मदतीची रक्कम जमा होते.
विम्यापूर्वी मदत
जिल्ह्याला ४१९ कोटी ४८ लाख २१ हजार ३०६ रुपये मंजूर झाले. हिंगोली ८१ कोटी ४४ लाख, कळमनुरी ८५ कोटी ९ २२ लाख, सेनगाव ९३ कोटी ३१ लाख, वसमत ८९ कोटी ६५ लाख तर औंढा तालुक्यासाठी ६९ कोटी १४ लाख रुपयांचा समावेश आहे.
किती याद्या अपलोड
हिंगोली | १३,४१० |
कळमनुरी | १५,२५६ |
सेनगाव | ४५,७९० |
वसमत | २०,२४९ |
औंढा नागनाथ | ३१,०६९ |
एकूण | १,२५,७७४ |