Join us

'निम्न मानार' प्रकल्प तळाला, सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:21 IST

निम्न मानार प्रकल्पात आता केवळ ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, हे पाणी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पुरणार आहे.

निम्न मानार प्रकल्पात आता केवळ ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, हे पाणी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पुरणार आहे. गेल्यावर्षी हा पाणीसाठा मार्च महिन्यात ५२ टक्के होता; मात्र यंदा त्यात २० टक्के घट झाली आहे. त्यामुळे कंधार, नायगाव, बिलोली या तीन तालुक्यांतील गावावर पाणीटंचाई संकट ओढवण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाच्या शेजारी पाण्याअभावी फळबागा माना टाकू लागल्या. निम्न मानार प्रकल्पातही पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. मार्च महिना सुरू झाला तसे कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामळे पाण्याच्या पातळीत चांगलीच घट होत आहे. पाणी पातळी खालावल्याने बागायती क्षेत्र अडचणीत आले आहे. तसेच लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या फळबागा पाण्याअभावी आता माना टाकू लागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारे ऊन व घटत जाणाऱ्या पाणी पातळीमुळे बागायती पिके अडचणीत आली आहेत.

पाण्यामुळे यंदा नवीन ऊस लागवडीकडे दुर्लक्ष

प्रकल्पाच्या शेजारी यंदा पाण्याचा साठा पाहून शेतकऱ्याने प्रकल्पात नवीन ऊस लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पात ३२ टक्के पाणीसाठा असून यावर्षी मागील वर्षीपेक्षा यंदा प्रकल्पात सध्याची टक्केवारी पाहता चांगलीच घट आहे. त्यामध्ये दररोज बाष्पीभवन प्रकल्प १०० टक्के भरला नसला तरी शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडल्या होत्या; परंतु पाणी पातळी पाहता उन्हाळी पाणी सोडण्याचे नियोजन सिंचनासाठी कसल्याही प्रकारचे अजून ठरलेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवून बाकीचे नियोजन मार्चअखेरपर्यंत करण्यात येणार आहे. - एम.बी. इनामदार, उपविभागीय अधिकारी, मानार जलाशय विभाग, बारुळ

 

टॅग्स :धरणपाणी टंचाईपाणीकपात