Join us

कडबा महागल्याने बळीराजा कसा जगविणार पशुधनाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 3:51 PM

चारा छावणीची होतेय मागणी

दुष्काळ सदृश परिस्थितीत वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्यांना बसू लागली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असताना जनावरांना लागणारा चारा महागला आहे. त्यामुळे पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असून कडब्याचा भाव प्रती शेकडा ३,००० ते ३,५०९ रुपये झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे ज्वारीचा पेरा घटल्याने चारा उपलब्ध होत नसून कडब्याचे भाव वधारल्याने शेतकरी त्रस्त आहेत. अनेक शेतकरी दुसऱ्या गावातून मिळेल त्या भावात चारा खरेदी करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. जनावरांना पोषक चारा म्हणून कडब्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बैलजोडी अथवा गाई, म्हशी पाळणारे शेतकरी चाऱ्यासाठी ज्वारीच्या पेरा करतात.

तालुक्यातील अनेक शेतकरी खुरपणी, काढणी, कडबा बांधणी, तसेच ज्वारी काढणीला मजूर मिळत नसल्याने सोयाबीन, हरभरा, उसाची पेरणी करतात. त्यामुळे ज्वारीचा पेरा कमी क्षेत्रात असल्याने कडबा भाव खात आहे. दूध व्यावसायिकांना या दरवाढीचा फटका बसला आहे. यामुळे दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने साठवण तलावांची पाणीपातळी कमी झाली आहे.

त्यामुळे साठवण तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना चारा पिकांची लागवड शक्य झाली नाही. त्यामुळे चाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. चाऱ्याची टंचाई शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरली आहे. खरीप हंगामातील मका, बाजरी या पिकांचा चारा शेतकऱ्यांनी साठवला आहे. तसेच गव्हाचे भुसकट पशुखाद्य म्हणून वापरले जात आहे.

हेही वाचा - तीन वर्षांतून एकदा माती नमुना तपासा; भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचे होईल विश्लेषण

तलावातून सर्रास पाणी उपसा

ग्रामीण भागात असलेल्या तलावामध्ये अवैधरीत्या मोटारी टाकून पाणी उपसा सुरु आहे. यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहे. तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे पाणी उपसा होत असून मुक्या जनावरांना पिण्यास पाणी मिळत नसल्याचा आरोप पशुपालकांतून होत आहे.

चारा छावणीची मागणी

■ भाकड जनावरे सांभाळणे तर दुभत्या जनावरांपेक्षा ही अवघड आहे.

■ होणाऱ्या खर्चाचा विचार करता ही जनावरे बाजारात नेऊन विकलेली बरी असा विचार आता पशुपालक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

■ सध्या तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शासनाच्या वतीने जनावरांसाठी चारा छावण्या लावण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गात जोर धरू लागली आहे.

टॅग्स :दुष्काळशेतकरीशेतीदुग्धव्यवसायगाय