Join us

Ethanol Production देशभरात तब्बल २३०० कोटीचे मोलॅसिस, इथेनॉल शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 09:48 IST

देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने 'बी हेवी' मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली खरी, पण बंदी असतानाही ज्यांनी तयार करून ठेवले त्यांनाच फायदा होणार आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने 'बी हेवी' मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली खरी, पण बंदी असतानाही ज्यांनी तयार करून ठेवले त्यांनाच फायदा होणार आहे.

राज्यात ११०० कोटी तर देशात २३०० कोटींचे मोलॅसिस व इथेनॉल शिल्लक आहे. तेल कंपन्यांनी सुमारे ६७ कोटी लिटर खरेदीची निविदा काढली असली, तरी कोटा वाढविण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये केंद्र शासनाने घेतलेल्या आढाव्यामध्ये देशातील साखरेची उपलब्धता कमी राहण्याचा आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात वाढीच्या भीतीपोटी केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी उसाचा रस, साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस बंदी आणली.

कारखान्यांमध्ये तयार असलेले इथेनॉल, इथेनॉलसाठी लागणारे बी हेवी मळीचे साठे तसेच तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. केंद्र सरकारने १५ डिसेंबर २०२३ रोजी सुधारित आदेश काढून शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याची इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन कारखान्यांना अंशतः दिलासा दिला.

जास्तीत जास्त १७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याची परवानगी देण्यात आली. हंगामात अपेक्षेपेक्षा २० ते २५ लाख टनाने साखर उत्पादन वाढल्याने शिल्लक राहिलेल्या सुमारे सात लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याची मागणी राष्ट्रीय साखर महासंघाने केंद्र सरकारकडे केली.

त्यानंतर २४ एप्रिल रोजी केंद्र शासनाकडून सुमारे ७ लाख टन शिल्लक बी हेवी मळीचा वापर इथेनॉलकडे करण्याची परवानगी दिली. यामधून सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवल्याने त्यातून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल. ज्याची किंमत २३०० कोटी आहे. यामुळे साखरेचे साठे कमी होण्यात मदत होणार आहे.

देशातील साखर उत्पादन आणि बफर स्टॉक करून शिल्लक राहणाऱ्यापैकी किमान २० लाख टन निर्यात करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर चांगला आहे.

शिल्लक मोलॅसिस आणि इथेनॉल (कोटी रुपयांमध्ये)महाराष्ट्र - ११००■ इतर राज्ये - १२००

मक्यापासून मोठ्या प्रमाणात निर्मितीमध्यंतरी साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीला निर्बंध घातल्यानंतर केंद्र सरकारने मक्यापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली. त्याचा फटकाही आता बसू शकतो.

बी हेवी' इथेनॉल साठविणे जोखमीचे 'बी हेवी'पासून तयार केलेले इथेनॉल टँकमध्ये साठवून ठेवणे जोखमीचे असते. त्यात वाढत्या तापमानामुळे अधिक धोका असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा: Sugar Export Ban चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन; मिळेल का निर्यातीला परवानगी

टॅग्स :साखर कारखानेऊसकेंद्र सरकारसरकारमहाराष्ट्रशेती