Join us

द्राक्ष बागांच्या खरड छाटणीला वेग; मजुरीसाठी सरासरी लागतायत २५ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:26 IST

आता एप्रिल महिना अखेर सुरू असून सोलापूर जिल्ह्यातील एकूण १५ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागेची खरड छाटणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

कुर्डूवाडी : गेल्या हंगामात पाऊस जास्त पडल्याने अनेकांच्या द्राक्ष बागा फेल गेल्याचे दिसून आले. आता एप्रिल महिना अखेर सुरू असून सोलापूर जिल्ह्यातील एकूण १५ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागेची खरड छाटणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

ती मोठ्या उत्साहात शेतकरी करून घेत असल्याचे दिसून येत आहे. यात त्याला मजुरीसाठी सरासरी २५ हजारांचा खर्च येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, बार्शी तालुक्यातील हिंगणी, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरात द्राक्ष व बेदाणा उत्पादन घेतले जाते.

तसेच कर्नाटकच्या बाजूकडील उमदी या भागातून व परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्ष व बेदाणा उत्पादित केला जातो.

सध्या शेतकऱ्यांकडून छाटणी सुरू असून मजुरांकडून किंवा ठेकेदारी पद्धतीने ही खरड छाटणी सुरू आहे. 

सरासरी मजुरी ७०० रुपयेसध्या मजुरांना ३०० ते ७०० रुपयांपर्यंत मजुरी मिळत असून त्यामध्ये महिलांना ३०० ते ५०० रुपये तर पुरुषांना ४०० ते ७०० रुपयांची मजुरी मिळू लागली आहे. त्यात वेळेवर मजूरही मिळत नाहीत.

फवारणीसाठी सरासरी ६५ हजार खर्चशेतकऱ्याकडून द्राक्ष बागेची खरड छाटणी केल्यानंतर त्याला सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील छाटणीपूर्वी भेसळ व गावखत अशा खतांसाठी २५ हजार रुपये व फवारणीसाठी १५ हजार रुपयांची औषधे असे एकूण ४० हजार लागतात. त्यामुळे छाटणी मजुरी व भेसळ, गावखत व औषधे फवारणीसाठी एकरी सरासरी ६५ हजार रुपयांचा खर्च बहार छाटणीपर्यंत येत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप नागरगोजे यांनी बोलताना सांगितले.

द्राक्षाला यंदा चांगले दिवस आले असून द्राक्ष लागवड ही आता सहजासहजी होणे अशक्य आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादन होण्याचे क्षेत्रफळ कमी झाल्याने पुढेही दर चांगले टिकून राहणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेच्या पालनपोषणाकडे चांगले लक्ष द्यावे. - नितीन कापसे, अध्यक्ष, कृषीनिष्ठ परिवार, कापसेवाडी (माढा)

अधिक वाचा: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिक व शेतजमीनीच्या नुकसान भरपाईसाठीही आता फार्मर आयडी लागणार

टॅग्स :द्राक्षेपीकफलोत्पादनफळेपीक व्यवस्थापनसोलापूरशेतकरीशेतीकामगार