प्रसाद माळी
सांगली: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व त्यांच्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरती बिझनेस प्रमोशन हा नवा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला आहे.
या नव्या टॅबच्या माध्यमातून लाभार्थी व्यावसायिक, उद्योजक त्यांचे सेवा, उत्पादने त्यांची किंमत, तसेच वैशिष्ट्य यांसह व्यवसायाशी संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर अपलोड करू शकणार आहेत.
महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन प्रकारात कर्ज दिले जाते. आता महामंडळाने लाभार्थ्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धीसह ग्राहकांपर्यंत पोहचणे सुलभ केले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकृत www.udyog.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Business Promotion (व्यवसाय वृद्धी) हा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला आहे.
या सुविधेमुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाला व्यापक प्रचार व प्रसिद्धी मिळणार असून, त्यांची उत्पादने व सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळेल, स्थानिक उत्पादने व सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध होतील, तसेच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सर्व संबंधित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली आवश्यक माहिती तत्काळ महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करावी. याबाबत कोणतीही अडचण अथवा योग्य मार्गदर्शनासाठी जिल्हा कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. - निशा पाटील, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील महामंडळ
अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
