Animal Husbandry :
सदानंद सिरसाट
खामगाव (बुलढाणा) : राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची पुनर्रचना व सुधारित आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्यानुसार २०१९ मध्ये झालेल्या पशुगणनेच्या आधारे किमान ५ हजार पशुधनासाठी चिकित्सालयांचे कार्यक्षेत्र तसेच ५ ते ८ किमीच्या परिघात दुसरे चिकित्सालय नको, असे निकष असल्याने पुनर्रचनेनंतर पशुपालकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
परिणामी राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दर ५ हजार पशुधन घटकामागे एक पदवीधर पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करण्याची शिफारस राष्ट्रीय कृषी आयोगाने केली.
त्यामुळे राज्यात बिगर डोंगरी भागात ५ हजार तर डोंगरी भागात ३ हजार पशुधनामागे एक पशुवैद्यकीत दुसरा पशुवैद्यकीय दवाखाना नसावा, असे निकष आहेत.
त्यामुळेच राज्यातील या दवाखान्यांची संख्या घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या अस्तित्वात असलेले दवाखानेही बंद होतील. तर उपचार करण्यासाठी नोंदणीकृत पशुवैद्यकीय पदवीधरच पात्र ठरतो. याप्रकाराने पदविका प्राप्त पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या कामकाजालाही मर्यादा येणार आहेत.
३४ जिल्ह्यात ४८५३ पशुवैद्यकीय संस्था
राज्यात सद्यःस्थितीत ३४ जिल्ह्यांमध्ये एकूण ४ हजार ८५३ पशुवैद्यकीय संस्था आहेत. यामध्ये ३३ जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, १६९ तालुका सर्व चिकित्सालये, १,७४५ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- १ (१,६६० स्थानिकस्तर, ८५ राज्यस्तर), तसेच २ हजार ८४१ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २ (२,२५६ स्थानिकस्तर, ५८५ राज्यस्तर) कार्यरत आहेत.
याचबरोबर ६५ फिरते दवाखाने आहेत.
जिल्हा परिषदांची भूमिका महत्त्वाची
राज्य क्षेत्राखालील तसेच जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या २ हजार ८४१ पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी- २ ची दर्जावाढ पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी- १ मध्ये प्रस्तावित आहेत.
त्या पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्र निश्चितीबाबत आढावा घेतला जात आहे.
पशुवैद्यकीय चिकित्सालयांचे कार्यक्षेत्र निश्चित करताना गावांची संख्या, मुख्यालयापासूनचे अंतर, भौगोलिक सलगता, दळणवळणाच्या सुविधा या बाबी विचारात घेतल्या जात आहेत.
मात्र, पशुधनाची संख्या पाहता अंतर वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.