अलिबाग : पांढऱ्या कांद्याची अलिबाग तालुक्यात लागवड पूर्ण झाली असून, फेब्रुवारीत तो बाजारात विक्रीस येण्याची शक्यता आहे.
कृषी विभागातर्फे ३ एकरमध्ये कांदा बी तयार केले आहे. त्यामुळे पुढल्या वर्षी लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
अलिबाग तालुक्यात नेहुली, कार्ले, वाडगाव, वेशवी, धोलपाडा, रुळे, खंडाळे, सागाव, तळवली या गावांत अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढरा कांद्याची लागवड केली जाते.
यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने डिसेंबर महिन्यात लागवड करण्यात आली होती. बी तयार होऊन जानेवारी ती पूर्ण करण्यात आली. कांद्यासाठी वातावरण उत्तम असल्याने यंदा पीक बहरणार आहे.
अलिबागचा पांढरा कांदा हा गुणकारी आणि औषधी असल्याने त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे अलिबागच्या कांद्याला स्वतः ची ओळख मिळाली आहे.
यंदाही अडीचशे हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कांदा काढणीला सुरुवात होणार आहे.
कृषी विभागाने केले बियाणे तयार• कृषी विभागाने पांढरा कांद्याचे लागवड क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक गुंठ्यात कांद्याचे बी तयार करण्यास सांगितले होते.• अलिबागमध्ये ३ एकर क्षेत्रावर कांद्याचे बी तयार केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी कांद्याचे लागवड क्षेत्र वाढणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
अधिक वाचा: आंबा पिकातील पुनर्मोहर व कीड-रोग नियंत्रणासाठी कोणत्या फवारण्या घ्याव्यात? वाचा सविस्तर