Join us

Agro Advisroy : वाढत्या थंडीत पिकांची कशी काळजी घ्यावी; वाचा कृषी सल्ला सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:28 IST

वाढत्या थंडीत पिकांची कशी काळजी घ्यावी तसेच पशूंची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भातील कृषी सल्ला वाचा सविस्तर (Agro Advisroy)

Agro Advisroy : मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. बदलत्या हवामानुसार पिकांची व पशूंची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात डॉ. वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषि सल्ला जारी केला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे.तर १९ ते २१ डिसेंबरदरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर किमान तापमानात पुढील तीन दिवसात हळूहळू ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवसात हवामान कोरडे राहण्याची तर १९ ते २१ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर किमान तापमानात पुढील तीन दिवसात हळूहळू ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात २० ते २६ डिसेंबरदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश :  किमान तापमानात झालेल्या घटीमुळे थंडीपासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळ्या जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस : वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.

तूरी : तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत.शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% ४.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५% ३ मिली किंवा इंडाक्झाकार्ब १४.५% ८ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५%  ८ मिली किंवा ल्युफेन्यूरॉन ५.४% १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ज्वारी : रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के  ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून ३० दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा ८७ किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

गहू : पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र १०९ किलो युरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी देऊन आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

मका : वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी :  केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस पहाटे मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. किमान तापमानात झालेल्या घटीमुळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी).खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल १०% ईसी १० मिली किंवा मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५% डब्ल्यू जी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

आंबा : आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

द्राक्ष : द्राक्ष बागेत ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीमुळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमुळे द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून, द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून घ्यावेत.

भाजीपाला

मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल १०% डब्ल्यूपी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

* थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी.

* नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे आदी लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकांशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते.

* थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामुळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीरब्बी हंगामपीकपीक व्यवस्थापनशेतकरीशेती