Join us

Agro Advisory : शेतकऱ्यांनो बदलत्या हवामानात पिकांसाठी करा 'या' उपायायोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:02 IST

Agro Advisory मराठवाड्यात येत्या २ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे तर २६ ते २८ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी. त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला दिला आहे वाचा सविस्तर

Agro Advisory : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या २ दिवस हवामानweather स्वच्छ व कोरडे तर २६ ते २८ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी त्यासंदर्भात डॉ. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला दिला आहे.

२६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचीrain शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर परभणी व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या २ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहील.

२६ ते २८ डिसेंबरदरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर परभणी व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात २७ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पावसाचा अंदाज पाहता काढणी केलेल्या पीकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे पावसाची उघडीप बघून करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस : कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

तूर : तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% ४.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५% ३ मिली किंवा इंडाक्झाकार्ब १४.५% ८ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५% ८ मिली किंवा ल्युफेन्यूरॉन ५.४% १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

ज्वारी : रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

गहू : पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र १०९ किलो युरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी देऊन आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी : केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल १०% ईसी १० मिली किंवा मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५% डब्ल्यू जी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

वांगे : वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

मिरची : मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल १०% डब्ल्यूपी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात वाढली आर्द्रता; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनहवामान