आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे निर्णय अधिक परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने 'महाविस्तार ए.आय. ॲप' उपलब्ध करून दिले आहे.
हे ॲप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल मार्गदर्शक ठरणार असून, त्यामध्ये पीकसल्ला, बाजारभाव, हवामान अंदाज, खतमापन, रोगनिदान, तसेच योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा अशा विविध माहितींचे एकत्रित व्यासपीठ उपलब्ध आहे.
महाविस्तार ए.आय. ॲपमध्ये चॅटबॉट स्वरूपात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सुविधा प्रदान करून देण्यात आली आहे. शेतकरी कोणताही प्रश्न विचारू शकतात आणि त्याचे उत्तर तत्काळ मिळते.
यामुळे वेळेची बचत होते आणि अचूक मार्गदर्शन मिळते. शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन अधिक शास्त्रशुद्ध व माहितीपूर्ण शेती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतविषयक माहितीसाठी ॲपचा वापर करावा!
शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲप प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून शेतीविषयक माहितीसाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जेणेकरून शेतीसंबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेताना शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
'महाविस्तार ए.आय. ॲप' ॲपमध्ये उपलब्ध सुविधा
पीकवाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृद आरोग्यपत्रिका आणि खत मात्रा, गणक हवामानानुसार तंत्रज्ञानाचा सल्ला, कीड व रोग ओळख आणि उपाय, सर्व पिकांचे बाजारभाव आदी सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहेत.
महाविस्तार ए. आय. ॲपच्या माध्यमातून शेतीविषयक सर्व माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर सहज उपलब्ध होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवून उत्पादनक्षमता व उत्पन्न वाढवण्याचे हे प्रभावी माध्यम आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा नियमितपणे वापर करावा. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा.
महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध
• महाडीबीटी, नानाजी देशमुख योजनांसाठी अर्ज सुविधा.
• गोडावून, अवजार, बँक आदी स्थानिक सुविधांची माहिती.
• शेतीसंबंधी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि प्रशिक्षण.
• योजनांचा लाभ घेण्याची कार्यपद्धती याचीही माहिती मिळणे सोयीचे होते.
शेतकऱ्यांसाठी माहिती व तंत्रज्ञान आधारित सुविधा देणारे 'महाविस्तार ए. आय. ॲप' हे शासनाच्या डिजिटल इंडिया व्हिजनशी सुसंगत असून, बुलढाणा जिल्ह्यातील बुल शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करून शेती अधिक वैज्ञानिक पद्धतीने करावी. - डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी.