अमरावती : कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान, नवीन वाणामुळे शेतकरी आता भरघोस उत्पन्न घेऊ लागले आहे. यामधील काही भाजीपाला व फळपिके सायन्स कोअर मैदानात १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनात (Agricultural Exhibition) ठेवण्यात आले आहे.
यामध्ये स्टार फ्रूट, ३०० वर केळीचे घड, फुटबॉलपेक्षाही मोठ्या आकाराची पानकोबीसह अनेक पिके व यांत्रिकी साहित्य तुफान गर्दी खेचत आहे.
मोठ्या आकाराची पानकोबी
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील दिनेश होगे यांच्या शेतामधील फुलबॉलसारख्या आकाराची पानकोबी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्र बनली आहे. टोकीता कंपनीचे डेली बॉल या वाणाची त्यांनी एक एकरमध्ये लागवड केली होती.
ड्रोनद्वारे करा फवारणी
केंद्र शासनाच्या ड्रोनदीदी उपक्रमाद्वारे शेती फवारणीसाठी आता ड्रोनचा वापर होत आहे. प्रदर्शनात ड्रोनदेखील विक्रीला ठेवण्यात आले आहे. बॅटरी, टाकीची क्षमता, किंमत, यासोबतच ड्रोनद्वारे कशा प्रकारे फवारणी केली जाते, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली.
केळीचा ४० किलोचा घड
या प्रदर्शनात ४० किलो वजनाचा व तब्बल २५ डझन केळी असलेला घड़ लक्ष वेधून घेत आहे. पथ्रोट येथील उमाशंकर दुबे यांच्या बगीच्यामधील हा घड आहे. राइझ अन्ड शाईन हे वाण व उती संवर्धन या तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे.
'कृषी उद्योग'ची शीतपेय
प्रदर्शनात शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या कृषी उद्योग महामंडळाद्वारे निर्मिती विविध प्रकारचे शीतपेय, टोमॅटो सॉस स्टॉलवर ठेवण्यात आल्याचे विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोंबरे यांनी सांगितले. येथेही सायंकाळी अमरावतीकरांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.