नाशिक : बागलाण तालुक्यात हवामान बदलाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, त्याचाच गैरफायदा काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून घेतला जात आहे. रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता सांगत कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर कृषी औषधांची अवाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण, आर्द्रता व तापमानातील चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे पिकांवर रोगांचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली असून, या गरजेचा फायदा घेत काही केंद्रांनी 'एमआरपी'पेक्षा अधिक दर, तसेच अनावश्यक औषधांचे पॅकेज शेतकऱ्यांच्या गळ्यात मारल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
औषधांच्या वाढीव दरांमुळे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, एका फवारणीसाठी पूर्वी ८०० ते १००० रुपये खर्च येत होता, तोच खर्च आता १५०० ते २००० रुपयांपर्यंत गेला आहे.
कृषी विभागाची उदासीनता
या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाकडून मात्र तपासणी मोहिमा, दरपत्रकांची पडताळणी, तक्रारींची दखल याबाबत कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाही. तालुक्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर दरपत्रके लावलेली नाहीत, तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
शेतकरी लुटला जात असताना यंत्रणा सुस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांचा कृषी व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी
सर्व कृषी सेवा केंद्रांवर एमआरपी व दरपत्रक सक्तीने लावावे. औषध विक्रीत बिल देणे बंधनकारक करावे. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी. दोषी केंद्रांवर दंड व परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई करावी.
