Join us

दुष्काळात मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 9:03 AM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी केले मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ, दाभरूळ, राजापूर आदी गाव शिवारातील मोसंबीच्या बागा पाण्याअभावी वाळत असल्याने शेतकरी या बागा मोडत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध करताच मंगळवारी कृषी विभागाचे अधिकारी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी या बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी तालुक्यातील ८ हजार हेक्टरवरील मोसंबीचे पीक धोक्यात आले आहे. याबाबतचे वृत्त १५ एप्रिलच्या अंकात 'लोकमत'ने प्रसिद्ध करताच कृषी विभाग खडबडून जागा झाला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख हे स्वतः मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास कृषी अधिकाऱ्यांना व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील केंद्रातील शास्त्रज्ञांना सोबत घेऊन पाहणीसाठी दाखल झाले. त्यांनी आडूळ, दाभरूळ, राजापूर आदी गाव शिवारातील मोसंबीच्या बागांना भेटी देऊन पाहणी केली.

त्यानंतर शास्त्रज्ञ संजय पाटील सोयगावकर यांनी भाऊसाहेब वाघ व कैलास कुलट यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच बागा कशा वाचवाव्यात, याबाबत माहिती दिली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, मंडळ कृषी अधिकारी भोसले, कृषी पर्यवेक्षक पठाडे, गुरव, सर्व कृषी सहायक, शेतकरी आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

मोसंबी फळबागा वाचविण्यासाठी हे करा उपाय 

यावेळी शास्त्रज्ञ संजय पाटील सोयगावकर म्हणाले, मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकयांनी झाडावरील फळांची संख्या कमी करावी. मोसंबीच्या झाडाला पालापाचोळा उसाचे पाचट याचे आच्छादन म्हणून वापर करावा. मोसंबीच्या फळबागेवर केओलीनचा वापर करावा.

फळ झाडांची योग्य पद्धतीने छाटणी करावी. शेतकऱ्यांनी मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. शेततळ्यामधील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी एरंडी तेलाचा वापर करावा. अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी देशमुख, शिरसाट यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :फळेदुष्काळपाणीकपातशेतीशेतकरी