बुलढाणा : एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावतीAmrawti विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. यंदाच्या या काळात बुलढाणाbuldhana जिल्ह्यातून ४६५.१८ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यातexport झाली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातून २७९.४९ कोटी, यवतमाळ १५०.६६ कोटी, अकोला १४५.८३ कोटी आणि वाशिम जिल्ह्यातून ३१.५२ कोटी, अशी एकूण १०७२.६७ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात विभागातून झाली आहे.
महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे.
यादृष्टीने जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून विविध उत्पादनाची विदेशात निर्यात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून निर्यात होणारी उत्पादने
जिल्ह्यातून सेंद्रिय रसायने, रासायनिक उत्पादने, साबण, अभियांत्रिकी उत्पादने, तृणधान्य, दागिने, सोयाबीन संबंधित उत्पादने, बियाणे, भाज्या आणि कापूस गाठींची निर्यात होते.
उद्योजकांनी जिल्ह्यात गुंतवणूक करावी
• बुलढाणा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासह कृषी, अन्न प्रक्रिया, बांबू प्रक्रिया, रसायन, गृहोपयोगी वस्तू, अभियांत्रिकी उत्पादने, सेंद्रिय रसायने, कापड उत्पादने यासह अन्य क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.
• जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. उद्योजकांनी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक करून रोजगार निर्मिती सोबत जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
अमरावती विभागातील जिल्हानिहाय निर्यात
जिल्हा | निर्यात |
बुलढाणा | ४६५.१८ |
अमरावती | २७९.४९ |
यवतमाळ | १५०.६६ |
अकोला | १४५.८३ |
वाशिम | ३१.५२ |
'या' देशांत होते निर्यात
अमेरिका, श्रीलंका, यूएई, सौदी अरब, ब्राझील, कोरिया, चीन, सिंगापूर, तुर्की, थायलंड, बांगलादेश, पाकिस्तान, व्हिएतनाम, नेदरलँड, झिम्बाब्वे, मलेशिया आदी देश जिल्ह्यातील उत्पादनाचे आयातदार आहेत. या देशांमध्ये जिल्ह्यातून विविध उत्पादनांची निर्यात केली जाते.