अकोला : पुष्प प्रदर्शनातील विविध मनमोहक फुलांनी शेतकरी, विद्यार्थ्यांना भुरळ घातली. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पहिल्याच दिवशी ५० हजारांवर शेतकऱ्यांनी भेट देत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह राज्यातील तीनही कृषी विद्यापीठाचे नवे तंत्रज्ञान, संशोधन जाणून घेतले.
यावर्षीच्या ॲग्रोटेक -२०२४ कृषी प्रदर्शनीचे प्रमुख आकर्षण ठरत असून, उद्यानविद्या विभागाच्या दालनातील विकसित विविध फळपिकाचे वाण, भाजीवर्गीय पिकाचे वाण तसेच विविध फळांच्याद्वारे तयार करण्यात आलेले प्रक्रियायुक्त पदार्थ शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे.
वनविद्या महाविद्यालयच्या दालनामध्ये वनशेतीसोबतच अखिल भारतीय समन्वय कृषी वनशेती संशोधन प्रकल्प यांच्यामार्फत विविध जातीचे बांबू प्रदर्शित करण्यात आले असून, व्यावसायिक लागवडीबद्दल माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कृषी पद्धती व पर्यावरण केंद्र यांच्या धरणामध्ये नैसर्गिक शेतीचे मॉडेल साकारण्यात आले आहे.
वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या दालनामध्ये विविध जैविक औषधे, बुरशीनाशके प्रदर्शित करण्यात आले असून विक्रीकरिता उपलब्ध केलेली आहेत. मृद विज्ञान विभाग यांच्या दालनामध्ये विभागाद्वारे विकसित केलेले द्रवरूप खत प्रदर्शित करण्यात आले आहे.
नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे
• कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान व प्रयोगांची माहिती पोहोचण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांप्रमाणेच प्रयोगशील शेतकऱ्यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
• यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक कक्षाला भेट देऊन शेतीतील नवीन तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठाचे संशोधन, विविध प्रयोगांची सविस्तर माहिती घेतली.
• यावेळी त्यांनी संशोधक, कृषी तज्ज्ञ, तसेच शेतकरी बांधव, बचत गटाच्या सदस्य महिला भगिनी, नवउद्योजक आदींशी संवाद साधून प्रयोग व नवीन उत्पादनांबाबत जाणून घेतले.
विषयानुसार पाच स्वतंत्र महादालने
प्रदर्शनात कृषी जागर, कृषी निविष्ठा, पुष्पांगण, कृषी प्रक्रिया उत्पादने अशी पाच स्वतंत्र महादालने उभारण्यात आली आहेत. त्याअंतर्गत, कृषी उत्पादने, निविष्ठा, फुले, यंत्र अवजारे, महिला बचत गट अशा सुमारे अडीचशे कक्षांचा समावेश आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून, कृषी मार्गदर्शनाबरोबरच रोजगार-स्वयंरोजगार व कौशल्याच्या नानाविध संधी जाणून घेता येणार आहेत. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शेती आणि प्रक्रिया उद्योगातील वैविध्य व नावीन्यता अनुभवता येणार आहे.
रेशीम, फेरोमेन ट्रॅप आकर्षण
रेशीम निर्मितीसोबतच फेरोमेन ट्रॅप, प्रादेशिक संशोधन केंद्रातील सोयाबीन पिकाच्या विविध वाणांची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली. अखिल भारतीय समन्वयक व्यवस्थापन संशोधन प्रकल्पातून व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसला. एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प व मत्स्य संशोधन विभागाकडून मत्स्य शेती, पालनांची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली.
एकात्मिक शेती पद्धती मॉडेल आकर्षण
एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उभारण्यात आले आहे. हे मॉडेल शेतकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीशी निगडित सर्व निविष्ठा व प्रात्यक्षिक यांच्या एकत्रित निविष्ठा ठेवण्यात आलेल्या असून, सेंद्रिय शेतीत उपयुक्त बायोपेस्टीसाइड्स आणि सेंद्रिय भाजीपालासुद्धा विक्रीला उपलब्ध करण्यात आला आहे. विद्यापीठाद्वारे विकसित करण्यात आलेल्या विविध कपाशी वाण व उत्पादन आदींबाबत शेतकरी माहिती जाणून घेण्यास उत्सुक दिसले.
राज्यातील विद्यापीठांचे वाण घेतले जाणून
परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले विविध कडधान्य, तृणधान्य, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले उसाचे वाण, भाजीवर्गीय पिके व ड्रोन तंत्रज्ञान शेतकरी, विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
हे ही वाचा सविस्तर :