पुणे : पाच महिन्यांपासून राज्यात सुमारे साडेतीन लाख दस्त नोंदणी होत असून यातून राज्याला महिन्याला सरासरी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आठ महिन्यांत आतापर्यंत सुमारे ३७ हजार ९८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
शासनाने दिलेल्या ६३ हजार ५०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी सुमारे ६० टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. पुढील चार महिन्यांत २५ हजार कोटी रुपये महसूल संकलनाचे आव्हान विभागापुढे आहे.
राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. विभागाने हे उद्दिष्ट सहज साध्य केले.
त्यानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने विभागाला ५५ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले. तरीही विभागाने तब्बल ५८ हजार २६६ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला. एकूण उद्दिष्टाच्या हे प्रमाण १०६ टक्के इतके होते.
त्यानंतर रेडीरेकनर दरवाढीनंतर नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाला २०२५-२६ या वर्षासाठी ६३ हजार ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रामुख्याने मुंबई व पुणे या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेता, हे उद्दिष्ट देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांत सरासरी साडेतीन लाख दस्त नोंदणी होत असून महिन्याला सरासरी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा महसूल संकलित होत आहे.
याचाच अर्थ दर महिन्याला आठ टक्के महसूल गोळा होत असून पुढील ४ महिन्यांत २५ हजार कोटी रूपयांचा महसूल संकलित करायचे उद्दीष्ठ ठेवले आहे.
| महिना | दस्त (संख्या) | महसूल (कोटी ₹) | टक्के (%) |
|---|---|---|---|
| एप्रिल | 3,70,852 | 3,747.14 | 5.90 |
| मे | 3,82,496 | 4,736.63 | 7.46 |
| जून | 3,79,995 | 4,440.50 | 6.99 |
| जुलै | 4,03,079 | 5,144.82 | 8.12 |
| ऑगस्ट | 3,31,710 | 4,915.95 | 7.74 |
| सप्टेंबर | 3,54,292 | 5,078.59 | 8.00 |
| ऑक्टोबर | 3,35,417 | 4,833.33 | 7.61 |
| नोव्हेंबर | 3,51,929 | 5,081.97 | 8.00 |
| एकूण | 29,09,770 | 37,989.59 | 59.83 |
चार महिन्यांत २५ हजार कोटी करायचे संकलित
◼️ पुढील ४ महिन्यांमध्ये तब्बल २५ हजार कोटी रुपये महसूल संकलित करायचा आहे. यासाठी महिन्याला सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवावा लागेल.
◼️ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत दस्त नोंदणी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे हे उद्दिष्ट सहज साध्य होईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
